नवी दिल्ली - कोरोनाचा वेग मंदावल्याने यंदा निर्बंधांशिवाय रामनवमी (RamNavami) साजरी करण्यात आली. देशभरात विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली. पण याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीला गालबोट लागलं, साबरकांठा आणि आणंद येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. हा वाद इतका टोकाला गेला की दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या गाडीला देखील आग लावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही जिल्ह्यांमध्ये रामनवमीच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. त्याच वेळी दोन्हीकडील लोकांनी एकमेकांवर दगडफेक करायला सुरुवात केली. दगडफेकीत अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. खूप गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी जाळपोळ सुद्धा करण्यात आली आहे. दोन गटांत झालेल्या या वादात जोरदार दगडफेक झाली. या दगडफेकीच्या घटनेत गुजरातमधील खंभात येथील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
आक्रमक झालेल्या जमावाने दुकाने आणि वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळ करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत नागरिकांसोबतच अनेक पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. या घटनेत नेमके किती जण जखमी झाले आहेत याबाबत माहिती अद्याप समजू शकलेली नाही. सध्या परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली असून संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.