कल्याण - कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला एक कैदी तंबाखू मळत असतानाच दुसऱ्या कैद्याने त्याला प्रतिबंध केला. तंबाखू मळू नकोस, माझ्या जेवणात पडेल, अशी तंबी दिलेल्या भडकलेल्या तंबाखू बहाद्दर कैदाने जाब विचारणाऱ्या कैद्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी हल्लेखोर कैद्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. संतोष साळूंके असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे. तर दानिश उर्फ मेंटल उमर इंजिनियर (27) असे मारहाणीत जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे.
जखमी कैदी दानिश हा अंबरनाथ शहरात राहणारा असून तोएका गुन्ह्यात आधारवाडी जेलमधील बॅरेक 1 च्या 5 नंबर सर्कलमध्ये शिक्षा भोगत आहे. तर त्याच बॅरेकमध्ये हल्लेखोर कैदी संतोष महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका गुन्ह्यासाठी तो 2 जानेवारी 2022 पासून आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्यातच 16 मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कैदी दानिश हा जेवण करत होता. तर हल्लेखोर कैदी संतोष हाताने तंबाखु मळत झटकत होता. हे पाहून मी जेवण करतोय, तू तंबाकू झटकू नको, अशी त्याने संतोष याला तंबी दिली. त्यामुळे कैदी संतोष भडकला. त्याने जेवणाऱ्या दानिशला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण केली. शिवाय कैदी दानिशच्या तोंडावर जोरदार बुक्का मारून त्याचा एक दातही पाडला. कैदयांची हाणामारी पाहून जेल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी कैदी दानिशला जेलमधील रुग्णालयात नेले. यात जखमी झालेल्या कैदी दानिशच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास व्ही. एस. केदार करत आहेत.