रायपूर - छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या हत्येच्या एका प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी मृताचे सहकर्मचारी आहेत, ते एकाच कंपनीमध्ये काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सुपरवायझर आरोपींची वारंवार तक्रार करायचा, त्यामुळे ते वैतागले होते. त्यातूनच त्यांनी सदर तरुणाची हत्या केली. त्यानंतर ते फरार झाले होते, अखेरीस विशेष सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अटक करण्यात आली.
दुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या २२ मे रोजी जामूल ठाण्यांतर्गत येणाऱ्या खेडा गावात एका तरुणाचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडला होता. त्याच्या मनगडावर मनोज मेहर असं नाव लिहिलेलं होतं. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीमधून मृत तरुण हा गावातीलच रवी उर्फ मानसिंह टंडन आणि पुनीत धृतलहरे यांच्यासोबत दिसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस मानसिंह याच्या घरी पोहोचले असता धक्कादायक माहिती समोर आली.
रवीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, त्याचा भाऊ मानसिंह आणि पुनित रायपूरच्या श्याम कंपाऊंडमध्ये एकत्र काम करायचे. मनोज त्यांचा सुपरवायझर होता. शनिवारी रवीने त्याला फोन करून बोलावले. त्यानंतर रवी पुनीत, ज्ञान सिंह आणि मनोज खेरधा येथे आले. तिथे ज्ञान सिंहला घरी सोडून ते तिघे फिरायला गेले. सकाळी मनोजचा मृतदेह शेतात पडलेला आहे, तसेच रवी आणि पुनित घरी आलेले नाहीत, याची माहिती ज्ञान सिंहला मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी मृत आणि आरोपी काम करत असलेल्या कंपनीमध्ये धाव घेतली. तेथील कागदपत्रांमधून मृताचं खरं नाव हे मनोज मार्कंडेय असल्याचे समोर आले. तसेच रवी आणि पुनितसोबत त्याचा वाद होता, याची माहिती मिळाली.
दरम्यान, खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी रवी आणि पुनितला ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये आरोपींनी सांगितले की, मृत मनोज हा त्यांची वारंवार बॉसकडे तक्रार करायचा. तसेच शिविगाळ करून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे ते वैतागले होते. त्यामुळेच त्यांनी हे कृत्य घडवून आणले. तसेच दारूची पार्टी करण्याचे आमिष दाखवून त्याला आणले आणि त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.