सातारा - सातारा जिल्ह्यातील एका दाम्पत्यासह त्यांच्या लहान मुलीचा ओदिशामध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओदिशामधील भुवनेश्वर येथे या तिघांचाही मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह हे साताऱ्यातील वडगाव हवेली येथे आणण्यात आले. मात्र मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांनी संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच रुग्णवाहिका पोलीस ठाण्यासमोर नेली. दरम्यान, पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून त्यांची तक्रार घेतल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
तुषार जगताप, त्यांची पत्नी नेहा आणि मुलगी शिवन्या अशी मृतांची नावे आहेत. ते सर्वजण मुळचे वडगाव हवेली येथील रहिवासी आहेत. त्यांचा भुवनेश्वर येथे संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणात भुवनेश्वर पोलिसांमध्ये हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, वडगाव हवेली येथील तुषार जगताप हे पत्नी आणि मुलीसह भुवनेश्वर येथे वास्तव्यास होते. तिथेच राहत्या घरी त्यांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर पोलिसांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून हे मृतदेह महाराष्ट्रात पाठवले होते. मात्र हे मृत्यू संशयास्पद असून, घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मृतदेह गावात आणल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. तसेच मृतदेह असलेली रुग्णवाहिका पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आली होती. अखेरीस पोलिसांनी तक्रार घेऊन समजूत काढल्यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.