नवी दिल्ली - दिल्ली परिवहन निगमच्या एका कर्मचाऱ्याच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, सदर व्यक्तीच्या दोन पत्नींनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. दरम्यान, हत्येनंतर पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली सदर कर्मचाऱ्याची पत्नी, माजी पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींची ओळख सदर डीटीसी कर्मचाऱ्याची पहिली पत्नी गीता (५४), मुलगी कोमल (२१) आणि दुसरी पत्नी गीता ऊर्फ नजमा (२८) अशी पटली आहे.
सदर डीटीसी कर्मचाऱ्याची पत्नी, माजी पत्नी आणि मुलगी मागच्या दोन-तीन वर्षांपासून त्याची हत्या करण्यासाठी कट रचत होत्या. हत्येनंतर तपास अधिकाऱ्यांनी मृताची दुसरी पत्नी नजमा हिच्या मोबाईलवर एका व्यक्तीच्या नंबर प्लेटचा एक डिलीट केलेला फोटो मिळाला आहे. डीटीसीच्या या कर्मचाऱ्याच्या सहा जुलै रोजी गोळी मारून हत्या करण्यात आली होती. हत्या करण्यात आली तेव्हा तो दुसरी पत्नी आणि मुलासोबत बाईकवरून जात होता.
दरम्यान, या डीटीसी कर्मचाऱ्याच्या हत्येसाठी त्याची दुसरी पत्नी नजमा हिचा चुलत भाऊ इक्बाल याने मदत केली. त्याच्याकडे हत्येसाठी एक मारेकरी शोधण्याचे काम सोपवण्यात आले होते. इक्बालने नयूम नावाच्या एका शूटरला यासाठी तयार केले. त्याला या कर्मचाऱ्याची हत्या करण्यासाठी १५ लाख रुपये देण्यात आले.
या हत्येबाबत डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितले की, संजीवची दुसरी पत्नी नजमा हिला सुमारे दोन तीन वर्षांपूर्वी त्याची पहिली पत्नी आणि मुलांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तिने त्यांच्याशी संपर्क साधला. पती संजीव तिला शिविगाळ करायचा. तसेच मारहाण करायचा, असा दावा नजमा हिने तपासात केला. तसेच संजीव कुमार याने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, असे या महिलांनी चौकशीमध्ये सांगितले. तसेच त्याची हत्या करून त्याची संपत्ती आपापसात वाटून घेण्यासाठी त्याची हत्या करण्याचा कट रचला असेही त्यांनी सांगितले.