Crime News: रेल्वे तिकीट नसल्याने दिव्यांग महिलेवर टि.सी.चा बलात्कार, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 07:40 AM2022-06-07T07:40:05+5:302022-06-07T07:44:47+5:30
पीडित महिला आणि तिचा पती गुना येथून सागरकडे जात होते. सागर जिल्ह्यातील मकरोनिया येथे महिलेचे माहेर आहे
भोपाळ - मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात रेल्वे प्रवासादरम्यान एका टि.सी.ने दिव्यांग महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर जीआरपीने सोमवारी आरोप टिसीविरुद्ध भादंवि कलम 376, 363 अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी रात्रीच्या प्रवासावेळी ही घटना घडली. महिलेकडे तिकीट नसल्याने टिसीने तिच्यावर बलात्कार केला.
पीडित महिला आणि तिचा पती गुना येथून सागरकडे जात होते. सागर जिल्ह्यातील मकरोनिया येथे महिलेचे माहेर आहे. त्यांना भागलपूर एक्सप्रेसने तेथे जायचे होते. त्यासाठी, संध्याकाळी 4.30 वाजता ते गुना रेल्वे स्टेशनवर पोहोचले. पत्नीला ट्रेनमध्ये बसवून तिचा नवरा तिकीट काढण्यासाठी निघून गेला. तितक्यात रेल्वे निघून गेली अन् तिचा पती स्टेशनवरच अडकला. दरम्यान, रात्री 8.15 वाजता महिला सागर स्टेशनवर पोहोचली.
रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व नोकरी करणाऱ्या टिसी राजूलाल मीणा यांनी महिलेकडे तिकीटाची मागणी केली. त्यावेळी, महिलेने तिकीट नसून घडलेला प्रसंग सांगितला. त्यावेळी, माझ्यासह मोठ्या साहेबांकडे चल, तुझे चलान कापले जाईल, अन्यथा एफआयआर होईल, असे टिसीने म्हटले. त्यामुळे, भीतीपोटी महिला टिसीसोबत गेली. आरोपी टिसीने महिलेला रेल्वे क्वॉर्टरकडे नेले. येथील स्वत:च्या क्वॉर्टरवर महिलेसोबत जबरदस्ती करत बलात्कार केला.
दरम्यान, महिलेच्या तक्रारीनंतर कैंट पोलिसांनी रविवारी जीआरपीकडे हे प्रकरण ट्रान्सफर केलं. त्यानुसार, सोमवारी जबलपूर येथून सागरला आलेल्या निरीक्षक शशी दुबे यांनी महिलेचा जबाब घेऊन कलम 376, 363 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी टिसाचा शोध सुरू असून पाहताक्षणीच अटक करण्याचे आदेश दिल्याचे निरीक्षक दुबे यांनी सांगितले.