नवी दिल्ली - तेलंगणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपा नेते ज्ञानेंद्र प्रसाद हे त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना ज्ञानेंद्र यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्ञानेंद्र यांनी आत्महत्या केली असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. पण अद्याप यामागचे कारण समजले नसून ही खरचं आत्महत्या होती की हत्या याबाबतच तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेंद्र प्रसाद हे सरलिंगमपल्ली मतदारसंघातून पक्षाच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य होते. सोमवारी त्यांच्या पीएने नाश्ता देण्यासाठी त्यांच्या रुमचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद आला नाही. यानंतर त्यांनी खोलीच्या खिडकीतून पाहिले असता ज्ञानेंद्र प्रसाद खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.
हैदराबाद येथील मियापूर पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता घराच्या पेंटहाऊसमध्ये ज्ञानेंद्र प्रसाद पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला असून नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.