ठाणे : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास २५ टक्के फायदा होईल, असे आमिष दाखवून ४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याविरुद्ध रोहित राठी यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची निर्मिती केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी दिली.
वागळे इस्टेट, समतानगर येथील रहिवासी रोहित राठी हे २५ जानेवारी २०२२ रोजी घरी होते. तेव्हा सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या टेलिग्राम युजर आयडीवर एका भामट्याने संपर्क करून आरोपीने संपर्क करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची गळ घातली. ही गुंतवणूक केल्यास किमान २५ टक्के फायदा होईल, असे प्रलोभन ही दाखविले. राठी यांनी या मोबाईल धारकावर विश्वास ठेवून २५ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधिताकडे ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. कालांतराने त्यांनी गुंतविलेले ४० लाख रुपये किंवा त्यापोटी २५ टक्के इतकी रक्कम त्यांना या भामट्याने परत केलीच नाही. नंतर फोनही त्याने बंद केला.
आपली फसवणूक झाल्याचे राठी यांच्या लक्षात आल्यानंतर याप्रकरणी राठी यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ड) नुसार २७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.