सोलापूर - जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अज्ञात चोरट्यांनीएटीएम मशिनवर धाडसी दरोडा टाकला आहे. बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएम मिशनचा दरवाजा पद्धतशीरपणे काढून तब्बल 22 लाख 99 हजार रुपयांची चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. चोरट्याने चोरी करताना रासायनिक स्प्रेचा वापर केला होता.
मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या एटीएम मशिनचा दरवाजा गॅस कटरच्या सहाय्याने उचकटून आतील तब्बल 22 लाख 99 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी पद्धतशीरपणे अगोदर सीसीटीव्ही कॅमेरे निकामी केले आणि गॅस कटरने एटीएम फोडून पैसे लुटले.
काळ्या रंगाचे जर्किन घातलेल्या आणि चेहरा झाकलेल्या अज्ञात चोरट्याने त्याच्या साथीदारांसह ही धाडसी चोरी केली. विशेष म्हणजे या चोराने एटीएम फोडण्यापूर्वी एक विशिष्ट रासायनिक स्प्रे वापरून सिसिटीव्ही कॅमेरे निकामी केले आहेत. याबाबत कामाती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सोलापूर ग्रामीण पोलीस करत आहेत.