बिहार - मी तुला विसरून जाईन हे होऊ शकत नाही आणि तू मला विसरशील हे मी होऊ देणार नाही, हा धडकन चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग वैशालीमधील लालगंज येथे घडलेल्या घटनेत अगदी तंतोतंत जुळला आहे. येथे बीकॉम शिकत असलेल्या अंकिता शर्मा या तरुणीची गोळी मारून करण्यात करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली ज्या तरुणाला अटक केली आहे तो अंकिताचा शेजारी आहे. तो अनेक वर्षांपासून अंकितावर प्रेम करत होता. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने सांगितले की, गेल्या काही काळापासून अंकिता सतत त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. एवढंच नाही तर तिने त्याचा फोन ब्लॉक केला होता. त्यामुळे प्रशांच नाराज होता. त्याबाबत विचारणा करण्यासाठी तो अंकिताला भेटण्यासाठी गेला होता. तिने जेव्हा त्याच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, तेव्हा संतापून त्याने अंकितावर गोळी झाडली, त्यात तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपासानंतर प्रशांत याला अटक केली आहे. प्रशांतने दाखवलेल्या जागेवरून पिस्तूलसुद्धा जप्त करण्यात आलं आहे. त्याचा वापर केल्यानंतर प्रशांतने ते तलावात फेकले होते. दरम्यान, आरोपी प्रशांत याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून अंकिता ही कुठल्यातरी दुसऱ्याच मुलाला पसंत करत होती. हत्येचं एक कारण हेही आहे. दरम्यान, १८ मे रोजी संध्याकाळी लालगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील ब्लॉक रोडमध्ये घडलेल्या या हत्याकांडाचा पूर्णपणे छडा लावल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.