चोरीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना आता घडली आहे. सूरत पोलिसांनी एका VIP चोरांच्या गँगला पकडलं आहे. जे दिल्लीतून सूरतला चोरी करण्यासाठी विमानाने यायचे. सूरतमधील महिधरपुरा वास्तादेवडी रोडवर असलेल्या वारा ज्वेलर्सच्या फॅक्ट्रीतून 5.80 लाखाची चोरी झाल्याचं समोर आलं होतं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची ही घटना कैद झाली होती.
पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना अटक केली आहे. चौकशी दरम्यान चोर हे दिल्लीवरून स्पेशली चोरी करण्यासाठी विमानाने य़ेत होते हे समोर आलं आहे. चोरीचा जो व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये दोन चोर सूरतच्या ऑफिसमध्ये तोंडावर रुमाल बांधून शिरतात. यानंतर त्यांचे इतरही सहकारी तोंडाला रुमाल लावून आतमध्ये शिरल्याचं पाहायला मिळतं. या सर्वांच्या हातात चोरीसाठी वापरण्यात येणारी हत्यारं आहे.
गॅस कटर देखील असल्याचं पाहायला मिळतं. चोर चोरी करत असतानाच अचानक पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या टीमला याची माहिती मिळाली. पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांना दोघांना पकडण्यात यश आलं. तर तीन जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले. दीनबहादूर हर्जी आणि राजेश शेट्टी असं पकडलेल्या दोन चोरांची नावं आहेत.
सूरत पोलिसांचे डीसीपी पिनाकिन परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एक दुसऱ्या राज्यातील गँग आहे. या गँगचे सदस्य दिल्लीहून सूरतला चोरी करण्यासाठी खासकरून विमानाने यायचे. 145.5 ग्रॅम सोन्याची चोरी झाली. त्याची बाजारात किंमत साधारण 5 लाख 80 हजार आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"