गुरुग्राम - हरियाणामध्ये अनेक गँगस्टर्सनी उच्छाद मांडला आहे. कुठलाही मोठा गुन्हा करण्यास ते मागेपुढे पाहत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार गुरुग्राममधील फारुखनगर येथून समोर आला आहे. येथे लग्न ठरलेल्या एका तरुणाला गँगस्टरने धमकी दिली की, तो ज्या तरुणीशी लग्न करणार आहे तिच्यावर त्याच्या भावाचं प्रेम आहे. या गँगस्टर्सनी त्या तरुणाला लग्न न करण्यासाठी धमकी दिली. त्यानंतर या गुंडांकडून फोनवर वारंवार धमक्या येत होत्या. अखेरीस या तरुणाचा विवाह पोलीसांच्या बंदोबस्ताखाली करण्यात आला.
धमकी मिळालेल्या तरुणाने सांगितलं की, त्याचा विवाह बंधवाडी येथे राहणाऱ्या तरुणीशी झाला. मात्र या विवाहापूर्वी त्याला एक कॉल आला. त्यात सांगण्यात आले की, ही तरुणी माझ्या भाईचं प्रेम आहे. जर तिच्याशी विवाह केला तर खूप वाईट परिणाम होतील. फोन करणाऱ्याने आपण कुख्यात गँगस्टरचा गुंड असल्याचे सांगितले. त्याच्या धमक्यांना घाबरलेल्या तरुणाने पोलिसांना याबाबत सांगितले. त्यानंतर पोलीस संरक्षणात त्याचा विवाह पार पडला.
याबाबत पोलीस अधिकारी प्रीतपाल सिंह यांनी सांगितले की, एका तरुणाने त्याला गुंडांकडून सातत्याने धमक्या येत असल्याची तक्रार दिली. त्यानंतर आम्ही पोलीस संरक्षणात त्याचं लग्न लावून दिलं. लग्नावेळी कुठलीही समस्या आली नाही. आता पोलीस ही धमकी खरंच कुण्या गुंडानं दिली होती की, कुठल्या तरुणाने खोडसाळपणा केला, याचा तपास करत आहेत.