गोंडा - उत्तर प्रदेशाती गोंडा येथील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे रस्त्यात सापडलेलं सीमकार्ड पोर्ट करणे एका युवकाच्या जीवावर बेतलं आहे. पैसे दिल्यानंतरही सातत्याने पोलीस ठाण्याला बोलावणे आणि मानसिक त्रास देणे, या जाचाला कंटाळून एका विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊ उचलले. याप्रकरणी कर्नलगंजचे सीओ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. परसपूरच्या चरसडी गावातील ही घटना आहे.
येथील रहिवाशी असलेले अरविंदसिंह यांनी सांगितले की, नितीनसिंह उर्फ राज या त्यांच्या मुलाला एक आठवड्यापूर्वी रस्त्यात एक सीमकार्ड सापडले होते. या सीमला पोर्ट करुन त्याने आपल्या बहिणीला वापरण्यासाठी दिले. त्यानंतर, 29 जानेवारी रोजी पोलिसांनी संबंधित नंबरवर फोन केला आणि अरविंदसिंह यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यावेळी, पोलिसांनी विनवणी करुनही 8 हजार रुपये घेतल्यानंतर सोडून दिले. मात्र, पोलिसांच्या भीतीने मुलगा नितीन दिल्लीला पळून गेला. त्यामुळे शनिवारी पोलिसांनी पुन्हा अरविंदसिंह यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तसेच, मुलाला पोलीस ठाण्यात हजर करण्याचा दबाव टाकण्यात आला. त्यामुळे, अरविंदसिंह यांनी दुसऱ्यांदा पोलिसांना 9 हजार रुपये दिले. मात्र, तरीही पोलिसांनी अरविंदसिंह यांना धमकी दिली.
पोलिसांच्या सातत्याच्या धमक्यांना कंटाळून अरविंद यांनी मुलगा नितीनला घरी बोलावले. नितीन घरीही आला, पण तो खूप घाबरलेला होता. अखेर पोलिसांच्या भीतीने नितीन सोमवारी सकाळी राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वडिल अरविंद यांनी 4 पोलीस शिपायांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संदीप सिंह यांनी याबाबत दुजारो दिला. तसेच, आरोपींसदर्भांत सत्य समोर आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही एसपी संतोष कुमार मिश्रा यांनी सांगितले.