नरेश डोंगरे
नागपूर : एमडी (मेफेड्रोन)च्या तस्करीत केलेली दगाबाजी दोन मित्रांना एकमेकांचे वैरी बनवून गेली. त्याचमुळे गोल्डी शंभरकरची त्याचा काही दिवसांपूर्वीपर्यंतचा मित्र जहांगीर खान याने साथीदारांच्या मदतीने भीषण हत्या केली. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गोल्डी शंभरकर हत्याकांडाचे सर्व आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. मात्र, हाती लागलेल्या तीन आरोपींच्या प्राथमिक तपासातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
आरोपी जहांगीर खान आणि गोल्डी शंभरकर यांचा दोस्ताना काही दिवसांपूर्वीपर्यंत गुन्हेगारी वर्तुळात चर्चेचा विषय होता. ते नुसते सोबत खात-पीतच नव्हते, तर गुन्हेही सोबतच करत होते. त्यांच्यावर दाखल बहुतांश गुन्ह्यात ते सोबतच आरोपी असल्याचे पोलीस सांगतात. त्यांना काही महिन्यांपूर्वी एमडीची लत लागली. एमडीचा शाैक महागडा शाैक असल्यामुळे तो पूर्ण करण्यासाठी ते एमडीच्या तस्करीत उतरले. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून ते एमडीची तस्करी करू लागले. लॉकडाऊनच्या काळात कधी गोल्ड, तर कधी जहांगीर एमडीची खेप आणण्यासाठी बाहेर जात होते. त्यातून त्यांचा शाैकही पूर्ण व्हायचा आणि पैसेही चांगले मिळायचे. त्यामुळे या दोघांच्या साथीदारांचीही संख्या वाढली. काही दिवसांपूर्वी एमडीची खेप आणण्यासाठी गोल्डी मुंबईला गेला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने तेथून ८० हजारांची एमडी आणली. नागपुरात परतल्यानंतर काय झाले कळायला मार्ग नाही. मात्र, एमडी खराब निघाल्याचे सांगून गोल्डीने जहांगीर आणि साथीदारांना टाळले. ८० हजारांच्या एमडीने गोल्डीची मती फिरवली. त्याने आपल्याशी दगा केला, ही बाब जहांगीरच्या जिव्हारी लागली. त्यामुळे या दोघांचा दोस्ताना तुटला. ते शत्रूसारखे एकमेकांना बघून घेण्याची धमकी देऊ लागले. गोल्डी क्रूर असल्याने तो आपला गेम करेल, अशी भीती वाटत असल्याने जहांगीरने त्याची हत्या करण्याचा कट रचला अन् गुरुवारी सकाळी थरारनाट्य घडवून आणले. आरोपी जहांगीर आणि साथीदारांनी गोल्डीच्या शरीरावर ३२ घाव घालून त्याच्या शरीराची अक्षरश: चाळण केली.
‘गोळ्यांची नशा
नागपुरातील अनेक हत्या प्रकरणात आरोपींनी नायट्रो टेनसारख्या नशा वाढविणाऱ्या गोळ्यांचा वापर केला आहे. ‘लोकमत’ने त्याबाबतचा धक्कादायक उलगडाही यापूर्वी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी साकोलीत (भंडारा) जाऊन आरोपी जहांगीर आणि साथीदारांच्या मुसक्या बांधल्या. यावेळी ते नशेत पुरते झिंगलेले होते. विशेष म्हणजे, त्यांच्या तोंडातून दारूचा दर्प येत नव्हता. त्यामुळे हत्या करण्यापूर्वी आरोपींनी नशा वाढविणाऱ्या गोळ्या खाल्ल्या असाव्या, असा पोलिसांना संशय आहे.