नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बस्ती पोलीस आणि सर्विलान्स टीमने एका गुन्हेगाराला अटक केली आहे. या भामट्यावर देशातील अनेक राज्यांमधील 200 हून अधिक मुलींची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. एका तरुणीची या गुन्हेगाराने फसवणूक केली. यानंतर हा खुलासा झाला. मुलीने तक्रार केल्यानंतर तपास सुरू झाला. यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की, यात केवळ एकच मुलगी नाही तर अशा शेकडो मुलींना आरोपीने धोका दिला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा नटवरलाल मुलींच्या कुंडलीत दोष दूर करणे, चांगला मुलगा मिळावा असं सांगून मुलींकडून बँक अकाऊंटमध्ये पैसे मागवून पूजा-पाठ करण्याचं नाटक करीत होता. साध्या मुलींना तो आपल्या जाळ्यात अडकवत होता. गाजियाबाद येथे राहणाऱ्या तरुण कुमारने कोरोना काळात इंटरनेटवर मेट्रिमोनियल एपच्या माध्यमातून एक प्लॅन बनवला होता.
वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून लोकांकडून पैसे उकळवण्यास सुरुवात केली. तो मेट्रिमोनियल साइटवर मुलीची फसवणूक करीत होता. कुंडली मिळवणं आणि ज्योतिषीकडून दूर करून घेण्याच्या नावाखाली अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्यास सांगत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हेगाराने आतापर्यत विविध राज्यांमधील 200 हून अधिक मुलींची मेट्रीमोनियल साइटच्या माध्यमातून फसवणूक केली आहे.
लग्न ठरवणं आणि नातं जोडून देण्याच्या नावाखाली मुलींकडून हळूहळू पैसे काढत होता. जेव्हा मुली त्याच्यावर दबाव आणत तर तो स्वत:ला मृत घोषित करत होता. डीपीवर फूल चढवलेला फोटोदेखील ठेवत होता. मुलीदेखील यावर विश्वास ठेवत होत्या. त्यांना खरचं याचा मृत्यू झाला आहे असं वाटायचं. पण आता आरोपीची पोलखोल झाली असून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.