करनाल (हरियाणा) - हरियाणामधील करनाल येथे एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. करनालमधील घरौंडा येथे एका जोडप्याचा बाथरूममध्ये श्वास गुदमरून मृत्यू झाला. मृत गौवर आणि शिल्पी यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. शुक्रवारी होळी खेळल्यानंतर हे दोघेही बाथरूमध्ये गेले. तिथे गॅस लिक झाल्याने ही दुर्घटना घडली. रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृतांचे कुटुंबीय असलेल्या योगेश कुमार यांनी सांगितले की, माझा चुलत भाऊ बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत पडला आहे, असा फोन मला आला. त्यांनंतर गावातील डॉक्टरकडे तपासून घेतले. मग पानिपतच्या खासगी रुग्णालयात नेले. तिथे त्यांना दाखल करून घेण्यात आले नाही. त्यानंतर आम्ही घरौंडाच्या सरकारी रुग्णालयात घेऊन गेलो, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार या बाथरूममध्ये गॅसवरील गिझर लागलेला होता. होळी साजरी केल्यानंतर हे दोघेही बाथरूममध्ये हातपाय धूत होते. तिथे असलेल्या गिझरमुळे त्यांचा श्वास कोंडला गेला. पाण्याची मोटार बराच वेळ बंद झाली नाही, तेव्हा आई त्यांना पाहायला गेली. तेव्हा हे दोघेही बेशुद्धावस्थेत पडलेले होते.
दरम्यान, पोलीस अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितले की, गौरव आणि शिल्पी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. कुटुंबातील लोकांनी सांगितले की, बाथरुममध्ये गॅस गिझर लावलेला होता. त्यातून गॅस लिक होऊन ही दुर्घटना घडली. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.