नवी दिल्ली - तेलंगणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खम्मम जिल्ह्यामधील एका गावात सोमवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर काही वेळातच चार अज्ञात लोकांना दिवसाढवळ्या एका नेत्याची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते तम्मिनेनी कृष्णैया असं हत्या करण्यात आलेल्या नेत्याचं नाव आहे. या संपूर्ण घटनेनंतर परिसरामधील तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या भागामध्ये जमावबंदीचं कलम 144 लागू केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागाअंतर्गत येणाऱ्या तेलडारुपल्ली गावामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते तम्मिनेनी कृष्णैया यांच्यावर चार हल्लेखोरांनी हल्ला चढवला. याच हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून पुन्हा आपल्या घरी जाण्याच्या मार्गावर असतानाच कृष्णैया यांच्यावर हा हल्ला झाला.
खम्मम जिल्ह्याचे सहायय्य पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार तम्मिनेनी कृष्णैया हे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर आपल्या बाईकने पुन्हा घराकडे निघाले होते. ते तेलदरुपत्ती गावाच्या हद्दीतून जात होते. त्याचवेळी एका ऑटो रिक्षामधून आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता ती कृष्णैया यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आता या चार हल्लेखोरांना पकडण्यासाठी चार तुकड्या तयार केल्या आहेत.
कृष्णैया यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये करण्यात आलं आहे. खम्मम ग्रामीण पोलिसांनी उपलब्ध माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे एफआयआर दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर मकापाचे नेते तम्मिनेनी कोटेश्वर राव यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने विरोध करण्यासाठी स्थानिकांची गर्दी जमा झाली होती.
काहींनी तम्मिनेननी कोटेश्वर राव यांच्या घरावर दगडफेक केली ज्यात घराच्या बाहेरील बाजूचं नुकसान झालं आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दी पांगवल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी सध्या तेलदारुपल्ली गावामध्ये कलम 144 लागू केला आहे. काही काळापूर्वीच तम्मिनेनी कृष्णैया यांनी सीपीएम सोडून टीआरएसमध्ये प्रवेश केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.