जयपूर - राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात अजून एक बोगस आणि लुटारू वधू एका तरुणाला गंडा घालून फरार झाली आहे. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत तिला श्रीगंगानगर जिल्ह्यातून अटक केली आहे. हे प्रकरण सिकर जिल्ह्यातील दादिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहे. ही लुटारू नववधू लग्ना केवळ १२ दिवस झाले असताना १६ तोळे दागिने आणि ७५ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाली होती. दरम्यान, ही महिला तीन मुलांची आई असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी सांगितले की, यासंदर्भात पिपराली परिसरातील सुरेश कुमार शर्मा याने २९ मे रोजी तक्रार दिली होती. त्याआधारे गुन्हा नोंद करून पोलिसांनी लुटारू नववधू गगनदीप हिला अटक केली. ती श्रीगंगानगर येथील राहणारी आहे. पोलिसांनी सांगितले की, सुरेशने १५ मे रोजी एका दलालामार्फत गगनदीप हिच्याशी विवाह केला होता. त्याबदल्यात दलालांनी त्याच्याकडून सुरुवातीला ५३ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर २३ हजार रुपये घेतले.
त्यानंतर सुरेश गगनदीपसोबत राहू लागला. मात्र लग्नाच्या १२ दिवसांनंतर गगनदीप घरातून १६ तोळे सोने आणि ७५ हजार रुपये घेऊन पसार झाली. त्यानंतर सुरेशने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यादरम्यान गगनदीप ही श्रीगंगानगर येथे जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या.