नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे Google वर सर्च करुन महिलेने मुलीच्या हत्येचा कट रचला आहे. उज्जैनमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एका निर्दयी आईने आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला पाण्यात बुडवून मारून टाकलं आहे. भयंकर म्हणजे मुलीला कसं मारायचं हे महिलेने गुगलवर सर्च केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैनच्या खाचरोड भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने गुगलवर सर्च केलं आणि तीन महिन्यांच्या मुलीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला. भटेवरा कुटुंबातील चिमुकलीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पण मुलीच्या हत्येचा संशय मुलीच्या आईवर होता. पोलिसांनी कसून तपास केला असता महिलेने आपणच हत्या केल्याची कबुली दिली आहे. पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मुलीची हत्या करणाऱ्या आईला अटक केली आहे.
गुगलवर मुलीला बुडवून कसं मारता येईल याबाबत केलं सर्च
हत्या करण्यापूर्वी काही वेळ आधी आरोपी आईने गुगलवर मुलीला बुडवून कसं मारता येईल याबाबत सर्च केलं आणि शेवटी तिने 12 ऑक्टोबर रोजी मुलीची हत्या करण्याचं ठरवलं. सोशल मीडियावर मुलांना मारण्याचा माहिती शोधत असल्याचं समजल्याचं कळताच पोलिसांनी आईला अटक केली. मात्र याआधी महिलेचा पती अर्पित, सासू अनिता आणि सासरे सुभाष भटेवरा यांनी मुलीची आई स्वातीवर हत्येचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पुढे योग्य तो तपास करण्यात आला.
पाण्याच्या टाकीमध्ये आढळला मुलीचा मृतदेह
खाचरौद असलेलं स्टेशन रोड येथील रहिवासी अर्पित भटेवरा यांची 12 ऑक्टोबरच्या दुपारी तीन महिन्यांची मुलगी विरती बेपत्ता झाली होती. अर्पितने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. शोधाशोध केली असता घराच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये विरतीचा मृतदेह आढळला. या प्रकरणाचा तपास केला असता विरतीला तिची आई स्वाती भटेवरा (28) हिने पाण्याच्या टाकीत फेकल्याचं समोर आलं. स्वातीला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. स्वाती आणि अर्पितचं लग्न फेब्रुवारी 2019 साली झालं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.