नवी दिल्ली - हुंडा घेणं हा गुन्हा असला तरी अद्यापही देशातील अनेक भागांत तो घेतला जातो. गाडी, पैसे, दागिने, फ्लॅट अशा स्वरूपात भेटवस्तूच्या नावाखाली मागणी केली जाते. हुंड्यापायी अनेक लग्न मोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच काही ठिकाणी तर सासरच्या मंडळींनी पैशाच्या हव्यासातून सुनेचा प्रचंड छळ करून तिची हत्या देखील केली आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. लग्नमंडपात आयत्या वेळी हुंड्यासाठी नवरदेव अडून बसला. त्याने अचानक पाच लाखांची मागणी केली. ही मागणी पूर्ण न होताच वरात घेऊन येण्यास नकार दिल्याची घटना घडली. उत्तर प्रदेशमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये हुंडा दिला नाही म्हणून लग्नाला नकार देणाऱ्या नवरदेवाच्या विरोधात वधू पक्षाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तसेच तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याला पाच लाख दिले नाहीत म्हणून वरात घेऊन येण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. नवरीकडच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. घरामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. पण मुलाकडची मंडळी वरात घेऊन आलीच नाहीत. दुसरीकडे नवरदेवानेही वधू पक्षाविरोधात खोटी तक्रार दाखल केली आहे.
लग्नमंडपात आयत्या वेळी हुंड्यासाठी अडून बसला नवरा
नवाबाद पोलीस ठाण्याच्या परिसरातील खुशीपुरामध्ये राहणाऱ्या तरुणीने एसएसपीकडे याबाबत तक्रार केली आहे. यामध्ये तिने तिचं लग्न हे मंडी रोड येथील निवासी कल्लू परिहारसोबत ठरलं होतं. घरामध्ये सर्व तयारी झाली होती. सर्व लोक वरात येणार याची वाट पाहत होते. तितक्यात मुलाकडच्या लोकांनी पाच लाख रुपयांची मागणी केली. जेव्हा त्यांची ही मागणी आम्ही पूर्ण करू शकलो नाहीत. तेव्हा त्यांनी वरात घेऊन येण्यास नकार दिला असं म्हटलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.