उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी एवढी आहे की पोलीसवाले देखील गुन्हे करू लागले आहेत. देवरिया जिल्ह्यात तैनात असलेला पोलीस शिपायाने त्याला आवडणाऱ्या मुलीशी दुसऱ्या कॉन्स्टेबलचे लग्न होऊ दिले नाहीय. यासाठी त्याने एवढी कारस्थाने केलीत की अखेर त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यातच गुन्हा नोंद झाला आहे.
शिपाई अरविंद हा गोरखपूरचा राहणारा आहे. त्याला तेथीलच एक मुलगी आवडत होती. तिच्याशी त्याला लग्न करायचे होते. यासाठी तिच्यावर तो दबाव टाकत होता. त्या तरुणीचे लग्न पोलीस दलातील दुसऱ्या एका क़ॉन्स्टेबलसोबत ठरले. यामुळे या आशिक शिपायाचे माथे फिरले. त्याने नातेवाईकांच्या मदतीने तरुणीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली.
यावर काही होत नाहीय हे पाहून त्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे घर गाठले आणि त्यांना तिच्याविरोधात भडकविण्यास सुरुवात केली. अखेर त्याच्या या प्रयत्नांना यश आले आणि त्यांचे ठरलेले लग्न मोडले. ही बाब त्या तरुणीला समजताच तिने थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठले आणि तिथेच न्याय मागितला. आता हे नाजूक प्रकरण एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेल्याने आरोपी पोलीस शिपाई आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या पोलिसासोबत त्या तरुणीचा साखरपुडा १२ मार्चला होणार होता. तिच्या घरी सर्व तयारी झाली होती. मात्र, अरविंद प्रतापने नातेवाईंकांकडून तिला धमक्या दिल्या. साखरपुडा केला तर ठीक होणार नाही अशी धमकी दिली. तसेच मेसेज तिला मोबाईलवरही पाठविले. त्यावर ऐकत नाही हे पाहून अरविंदने मनोज नावाच्या नातेवाईकाला नवऱ्या मुलाच्या घरी पाठविले. त्या मुलीशी लग्न केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी त्यांना देण्यात आली. यामुळे ते साखरपुड्याला आले नाहीत व लग्न मोडले, असा आरोप तरुणीने केला आहे.