प्रयागराज: उत्तर प्रदेशातील संगम शहरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. शिक्षकाने मारल्यामुळे 10वीत शिकणारा एक विद्यार्थी गावठी पिस्तूल घेऊन शाळेत गेला. त्याला त्या शिक्षकाला मारायचे होते, पण सुदैवाने शाळेत तपासणीदरम्यान त्याच्याकडील पिस्तुल पकडली गेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दालपूर खास येथील एका शाळेत 10वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलाच्या बॅगेत अवैध पिस्तूल आढळली. पोलिस ठाण्याचे प्रभारी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात अशी चर्चा आहे की, शाळेतील शिक्षकाने त्या मुलाला शाळेत सर्वांसमोर मारले आणि कोंबडा होण्याची शिक्षा दिली. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकाला मारहाण्याचा डाव आखला.
बॅगमध्ये पिस्तूल आढळल्यानंत शाळेत एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेनंतर शिक्षकांनी तात्काळ त्या मुलाला पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांच्या चौकशीत आरोपी मुलाने हे अवैध शस्त्र दुसऱ्या एका मुलाकडून विकत घेतल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नापास झाल्यामुळे शिक्षकाला बांधून मारहाण यापूर्वी झारखंडमधील दुमका येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले होते. गोपीकंदर अनुसूचित जमाती निवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक शिक्षक कुमार सुमन आणि लिपिक सोनेराम चडा यांना आंब्याच्या झाडाला बांधून मारहाण केली. विद्यार्थ्यांनी मारहाणीचा व्हिडिओही बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रॅक्टिकलमध्ये कमी गुण दिल्यामुळे विद्यार्थी नापास झाले, त्यामुळेच त्यांनी शिक्षकाला मारहाण केली.