उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणात पोलिसांनी भाजपा नेता व माजी राज्यमंत्र्याच्या मुलासह तीन आरोपींना अटक केली. तिने रिसॉर्टमध्ये काय धंदे चालतात याची माहिती उघड करण्याची धमकी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा मृतदेह एका नाल्यात आढळला होता. या प्रकरणी महिलांनी पोलिसांची कार अडवून त्यात बसलेल्या आरोपींना बेदम मारहाण केली.
पोलिसांच्या चौकशीवेळी तिन्ही आरोपींनी अंकिताला चिला शक्ती नाल्यात ढकलल्याचे स्वीकारले आहे. या प्रकरणी माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य याला अटक करण्यात आली आहे. अंकिता नुकतीच आर्य याच्या रिसॉर्टवर रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी सुरु केली होती. तिला रिसॉर्टमध्ये बरेच गैरप्रकार सुरु असल्याचे समजले होते. यावर तिने आर्यला जगजाहीर करण्याची धमकी दिली होती.
अंकिताला ढकलून आल्यावर आरोपींनी रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांशी अंकिता जिवंत असल्यासारखीच वागणूक दिली होती. त्याच रात्री आरोपी हरिद्वारला पळून गेले. तिथून पुलकितने त्याच्या रिसॉर्टवर फोन केला आणि अंकिता भंडारीला बोलवण्यास सांगितले. तिच्याशी का बोलायचेय याचे कारणही सांगितले. यावर रिसॉर्टच्या कर्मचाऱ्याने ती कुठे दिसत नसल्याचे सांगितल्यावर त्याला पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल करण्यास सांगितले. अंकिताच्या कुटुंबीयांनी तिच्याशी बेपत्ता होण्याच्या आदल्या रात्री तिच्या रिस़ॉर्टमधील खोलीतून फोन केला होता, असे सांगितले. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला.
पुलकितने तिला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतचे चॅट आणि कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांना मिळाले आहेत. रिसॉर्टच्या कर्मचाऱ्याशी बोलत असताना ती रडत असल्याचे ऐकायला येत आहे. यावरून पोलिसांचा पुलकितवर संशय बळावला होता. अनेक दिवस या प्रकरणी पोलिसांनी काहीही केले नाही. अखेर आमदार रेणू बिष्ट यांच्यासह नातेवाईकांनी व नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला तेव्हा हालचाली सुरु झाल्या.