नागपूर : भाडेकरूचा त्रास असह्य झाल्याने जरीपटक्यातील एका घरमालकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गळफास लावण्यापूर्वी मृतकाने स्वत:चा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेमुळे शहरभर खळबळ उडाली आहे.
मुकेशकुमार श्रीचंद रिजवानी (४६) असे मृत घरमालकाचे नाव आहे. ते जरीपटक्यातील कस्तुरबानगरात राहत होते. नाष्टा सेंटर चालविणाऱ्या रिजवानी यांनी आरोपी राजेश ऊर्फ राजा नामोमल सेतिया (४५) याला काही वर्षांपूर्वी दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या. मात्र, ठरल्याप्रमाणे आरोपी राजेश मुकेश यांना घरभाडे देत नव्हता. भाड्याची मागणी केली असता तो शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत होता. त्याचा मोठा भाऊ वेगवेगळ्या विभागात तक्रारी करून रिजवानी यांना त्रास देत होता. वारंवार होत असलेल्या वादामुळे रिजवानी यांनी आरोपींना सप्टेंबर २०१९ मध्ये घर खाली करून मागितले. यावेळी आरोपीने त्यांना घर खाली करून देण्यासाठी १० लाखांची खंडणी मागितली. रिजवानी यांनी आरोपीला ६० हजार रुपये दिले. आणखी ४.५० लाख रुपये मिळावे म्हणून आरोपी त्यांचा छळ करीत होता, तर राजाचा मोठा भाऊ मूलचंदही त्याला साथ देत होता. त्रास असह्य झाल्यामुळे ६ ऑक्टोबरला सायंकाळी रिजवानी यांनी गळफास लावून आत्महत्या केली. तत्पूर्वी, रिजवानी यांनी स्वत:चा व्हिडिओ बनविला. त्यात आत्महत्येला सेतिया बंधू जबाबदार असल्याचे म्हटले. रिजवानी यांनी एका वकिलाचेही नाव घेतले. व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला. त्यानंतर कशिश रिजवानी यांनी शनिवारी रात्री जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी आरोपी सेतिया बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल केला. ते फरार झाले आहेत.