रांची - झारखंडमधील पाकुड जिल्ह्यातील महेशपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये मैत्रिणीचा बालविवाह रोखण्यासाठी गेलेल्या तीन मैत्रिणींना गावातील पंचायतीन शिक्षा सुनावली आहे. तिघींनाही प्रत्येकी १७ हजार रुपयांचा दंड पंचायतीने सुनावला आहे. ही घटना लुतीबाडी गावातील आहे. गेल्या मंगळवारी येथे तीन मुली एका मुलीचा विवाह मोडण्यासाठी आल्या होत्या. त्या तिघीही तिच्यावर विवाह मोडण्यासाठी दबाव आणत होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक आदिवासींनी या तिघींपैकी दोघींना पकडले. मात्र तिसरी मुलगी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली. दरम्यान, पंचायतीने तिघींना प्रत्येकी १७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर तिघींची मुक्तता केली.
ग्रामस्थांनी सांगितले की, या तिघीजणी लग्न न करण्याचा दबाव आणण्यासाठी त्यांची मैत्रिण असलेल्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. त्यांच्यापैकी दोघींना ग्रामस्थांनी पकडले. तर एकीने तिथून पळून जाण्यात यश मिळवले. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस अधिकारी गावात पोहोचले. त्यांनी दोन्ही मुलींची सुटका करण्याचे आदेश ग्रामस्थांना दिले. तेव्हा या मुलींना ओलीस ठेवलेले नाही तर केवळ पकडून ठेवण्यात आले आहे, असे सांगितले. आदिवासी रीती-रिवाजानुसार तिघींना दंड ठोठावण्यात येईल, नंतर सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर दोन पोलिसांची तैनाती करून पोलीस अधिकारी गावातून माघारी आले.
दरम्यान, पकडलेल्या दोन्ही तरुणींना गावच्या सरपंचाच्या घरात ठेवण्यात आले. तसेच तिघींच्याही पालकांना बोलावण्यात आले. त्यानंतर तिन्ही तरुणी आणि त्यांच्या पालकांनी चूक मान्य केली. त्यानंतर तिघींनाही दंड ठोठावून सोडण्यात आले.
मिळत असलेल्या माहितीनुसार ज्या तरुणीचा विवाह होणार होता ती अल्पवयीन आहे. त्यामुळे तिन्ही मैत्रिणी तिच्या विवाहाला विरोध करत होत्या. तसेच लग्न न करण्यासाठी दबाव आणत होत्या.