- तानाजी पोवारकोल्हापूर : व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या सांगलीतील टोळीला कोल्हापुरात वन विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी सापळा रचून पकडले. ही कारवाई न्यू पॅलेस परिसरात करण्यात आली. टोळीतील सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे सव्वातीन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी तसेच मोटारकार, दुचाकी व मोबाईल असा सुमारे साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक केलेल्या संशयितांची नावे अशी : किस्मत दस्तगीर नदाफ (रा. इस्लामपूर), विश्वनाथ वामन नामदास (रा. मोरेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली), अस्लम सिराज मुजावर (रा. बनापूर, ता. खानापूर), रफिक शौकत सनदी (रा. मिरज, ता. मिरज, जि. सांगली), आलमशाह मुल्ला, उदय जाधव (सर्व रा. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सांगली जिल्ह्यात व्हेल माशांची उलटी विक्री करणारी टोळी अस्तित्वात असल्याची माहिती कोल्हापूर वन विभागास मिळाली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्राहक असल्याचे भासवून त्या टोळीशी फोनवर संपर्क साधला. त्यानंतर ते कोल्हापुरात येणार असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची मदत घेतली. ही टोळी कोल्हापुरात आली. त्यानंतर दसरा चौकात चर्चा करण्यासाठी आली. त्यावेळी वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे यांनी ग्राहक बनून त्यांची दसरा चौकात भेट घेतली. खरेदी करणार असल्याचे सांगून कांबळे यांनी त्यांना बॅगेतील पैसेही दाखवले. त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना व्हेल माशाची उलटी घेऊन न्यू पॅलेस परिसरात बोलावले. त्यावेळी वनविभागाचे अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी सहा जणांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडील व्हेल माशाच्या उलटीसह सुमारे साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना वन विभागाच्या ताराबाई पार्कमधील रेस्ट हाउसवर नेण्यात आले. त्यांना आज, शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.