रायपूर - छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यामध्ये एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या महिलेने शिताफीने तलावात उडी मारून स्वत:चे प्राण वाचवले. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या महिलेला आग लावणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाही तर त्या महिलेचा पती आणि त्याची दुसरी पत्नी म्हणजे पीडित महिलेची सवत होती. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. तसेच पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी पीडिता आणि आरोपींशी संबंधित लोकांकडे चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांकेर येथील पखांजूर येथील कापसी पीव्ही-७ येथे ही धक्कादायक घटना घडली. पीव्ही-७ येथील उज्ज्वल मंडल याचा सुमारे १७ वर्षांपूर्वी सविता मंडल हिच्याशी विवाह झाला होता. दोघांचीही दोन मुलेही आहेत. दोघांच्या नात्यामध्ये १५ वर्षांपर्यंत सारे काही ठीक होते. मात्र दोन वर्षांपूर्वी उज्ज्वलच्या संपर्कात महाराष्ट्रातील जेबा मंडल आली. दोघेही प्रेमात पडले. त्यानंतर उज्ज्वलने तिच्याशी लग्न केले. मग हा उज्ज्वल दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहू लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पत्नींमध्ये रात्री पतीसोबत झोपायचं कोण, यावरून रोज भांडण व्हायचे. त्यात गेल्या २८ मार्च रोजी रात्री सविता पतीसोबत झोपण्यासाठी अंथरूण घालत होती. तेव्हा दुसरी पत्नी असलेल्या जेबा हिने त्याला विरोध केला. वाद खूप वाढला. तेवढ्यात तिथे सासू पोहोचली. तिने सुनांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात उज्ज्वलही तिथे पोहोचला. त्याने दुसऱ्या पत्नीची बाजू घेत पहिली पत्नी सविता हिला खडसावण्यास सुरुवात केली. उज्ज्वल आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीने घरातून रॉकेल आणून सविताच्या अंगावर ओतले. त्या पेटलेल्या अवस्थेर सविताने जवळच्या तलावात उडी मारली. सध्या गंभीर जखमी असलेल्या सवितावर उपचार सुरू आहेत.