नवी दिल्ली - बिहारच्या गयामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला 9 वर्षांपूर्वी बायकोच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. पण आता तब्बल 9 वर्षांनी तीच पत्नी जिवंत आढळली आहे. संबंधित विवाहित महिला बाजारात फिरताना आढळल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींना मोठा धक्काच बसला आहे. त्य़ांच्या पायाखलची जमीनच सरकली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेस ताब्यात घेतलं आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उषा कुमारी असं विवाहित महिलेचं नाव आहे. तर विजय कुमार असं शिक्षा झालेल्या पतीचं नाव आहे. विजय कुमार हे आपल्या पत्नीसह बिहारमधील गया शहरानजीक असणाऱ्या अबगिला येथे वास्तव्याला होते. त्यांची पत्नी उषा नऊ वर्षांपूर्वी अचानक गायब झाली होती. या प्रकरणी माहेरच्या मंडळींनी पती विजय कुमार, सासू आणि दिराविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पती विजयला तीन महिन्यांचा कारावास देखील झाला होता.
सासूला उच्च न्यायालयातून जामीन घ्यावा लागला होता. हा खटला अद्याप न्यायालयात आहे. दीर रणजीत यांने दिलेल्या माहितीनुसार, 'एके दिवशी सायंकाळी आमची बहीण दूध आणण्यासाठी बाजारात गेली होती. यावेळी त्यांना नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली आपली वहिनी दिसली. वहिनीला असं जिवंत पाहून तिला धक्काच बसला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने घरी येऊन आम्हाला याची माहिती दिली. पत्नी जिवंत असल्याचं कळाल्यानंतर पती विजय आणि कुटुंबीय उषाच्या माहेरी गेले.
उषाने त्यानंतर दुसरं लग्न करणार असल्याचं सांगत सासरी येण्यास नकार दिला. त्यानंतर विजयनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत उषाला ताब्यात घेतलं आहे. एखादी महिला सात वर्षे सापडली नाही, तर तिला मृत समजलं जातं. संबंधित महिला नऊ वर्षांनी परतल्याने तत्कालीन साक्षींच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. तसेच खोटी फिर्याद दाखल केल्याप्रकरणी माहेरकडील लोकांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.