मध्य प्रदेशच्या रीवामध्ये २२ ऑगस्टला एका वृद्धाची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांना गेला दीड महिना काही हाती लागत नव्हते. विधवा सून घरात राहत होती, पण संशय घेणार कोणावर अशा अडचणीत पोलीस सापडले होते. अखेर पोलिसांनी त्या वृद्धाचा खून त्या विधवा सुनेनेच केल्याचे समजले आणि उलगडा झाला.
महिलेच्या पतीचा तीन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. या काळात तिचे तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणासोबत सूत जुळले. हे त्या सासऱ्याला समजले होते, त्याला ते आवडत नव्हते. तिला मुलेही होती. २३ ऑगस्टच्या सकाळी मृत वृद्धाचा नातू त्याच्या खोलीत गेला, तेव्हा त्याचा आजोबा मृतावस्थेत दिसला. त्याने आरडाओरडा करताच शेजारचे लोक जमा झाले. पोलिसही आले. सुनेने त्यांना आपल्याला काही माहिती नाही, असे पोलिसांना सांगितले.
मी माझ्या खोलीत झोपले होते, सासऱ्याला कोणी मारले याची आपल्याला माहिती नाही, असे ती सांगत होती. यावेळी तिने रडण्याचे नाटकही केले. पोलिसांना तिचा संशय आला होता. परंतू, क्ल्यू सापडत नव्हता. म्हणून पोलिसांनी तिचा फोन ट्रेस करण्यास सुरुवात केली. काही दिवस लोटले तरी ती कोणाला फोन करेना, तिला कोणाचा फोन येईना. गावकऱ्यांनी तिचे एका तरुणासोबत लफडे असल्याचे पोलिसांना सांगितले होते. एवढे दिवस दूर राहिल्याने कासाविस झालेल्या तिच्या बॉयफ्रेंडचा अखेर फोन आला.
त्यांचे बोलणे ऐकून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत सुनेने गुन्हा कबुल केला. तिच्या लफड्याची माहिती सासऱ्याला लागली होती. त्याने विरोध सुरु केला होता. यामुळे प्रेमसंबंधांत अडथळा बनणाऱ्या सासऱ्याचा २२ ऑगस्टच्या रात्री गळा घोटला. यानंतर सून आणि तिचा प्रियकर त्याच खोलीत झोपले, त्यांनी तेव्हा शरीरसंबंधही ठेवले, सकाळ उजाडण्यापूर्वीच प्रियकर तिथून पसार झाला होता. एसएसपी नवनीत भसीन यांनी या दोघांवर हत्येचा गुन्हा नोंद केल्याचे म्हटले आहे.