नवी दिल्ली - छत्तीसगडच्या दुर्ग जिल्हा पोलिसांनी एका हत्येप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. या हत्येतील मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह प्रियकरासह पत्नीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने ही घटना घडवून आणली. हत्येनंतर त्याने चाचणी केली आणि रुग्णालयात दाखल झाला. जेणेकरून कोणीही त्याच्यावर संशय घेऊ नये. दुसरीकडे आपला गुन्हा लपवण्यासाठी मृताची पत्नी आपल्या मुलांसह खोलीत गेली आणि तिला बाहेरून कुलूप लावले. जेणेकरून पत्नी आणि मुलांना खोलीत कोंडून कोणीतरी तरुणाची हत्या केली असं लोकांना वाटेल. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली आहे.
25 जानेवारी रोजी दुर्ग जिल्ह्यातील भिलाई-चरोडा परिसरात पोलिसांना खोलीत तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. घराच्या हॉलमध्ये सोफ्यावर तरुणाचा मृतदेह पडलेला होता. त्यांची पत्नी व मुले खोलीत असताना दरवाजा बाहेरून बंद होता. पोलिसांच्या तपासात मृताच्या पत्नीवर सुरुवातीपासूनच संशय होता. त्यामुळे पोलिसांनी पत्नीच्या आधारे तपास केला असता संपूर्ण प्रकरण उघड झाले. प्रेमप्रकरणातून ही संपूर्ण घटना नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याचं समजलं. 25 जानेवारी रोजी मृत सुनील शर्मा याचा रक्ताने थारोळ्यात मृतदेह त्यांच्या खोलीत आढळून आला होता. पत्नीने घरातील सदस्यांना फोनवरून खोली बाहेरून बंद केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आई-वडील आल्यावर हत्येचा प्रकार समोर आला.
पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या
दुर्ग शहराचे एएसपी संजय ध्रुव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या तपासात मृताची पत्नी राणी हिचे धीरज कश्यप याच्याशी संबंध असल्याची माहिती मिळाली. यासोबतच तो कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस त्याच्या बरे होण्याची वाट पाहत राहिले आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांसमोर संपूर्ण हकीकत सांगितली. कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी आरोपीने हा संपूर्ण कट रचला. या प्रकरणातील दोन्ही आरोपींकडून घटनास्थळावरून पोलिसांनी घटनेत वापरलेले लोखंडी हत्यार, रक्ताने माखलेले कपडे आणि घटनेच्या वेळी घातलेला दुपट्टा जप्त केला आहे.
नात्याला काळीमा! 'दोन समस्या एकदाच संपवल्या'
पोलिसांच्या चौकशीत पत्नी राणीने दिलेल्या माहितीनुसार, ती आणि तिचा प्रियकर धीरज यांनी मिळून संदीप नावाच्या तरुणाला नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं आणि त्याच्याकडून पैसे घेतले. काम न मिळाल्याने संदीपने त्याच्याकडे पैसे मागायला सुरुवात केली, मात्र पैसे खर्च झाले होते. संदीपने पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. यानंतर दोघांनी संदीपला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली. मात्र पैशांची व्यवस्था होऊ शकली नाही. यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने सुनीलच्या हत्येचा कट रचला. कारण त्यांना सुनीलला त्याच्या मार्गातून हटवायचे होते आणि जर नवऱ्याला मारले गेले तर पैसे परत करण्यासाठी त्यांना आणखी वेळ मिळाला असता. अशा परिस्थितीत एकाच वेळी 2 समस्या सोडवल्या जातील असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.