नवी दिल्ली - छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कोरबामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी माहेराहून न परतल्याने एका व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं आहे. भगवान शंकराला आपली बोटं कापून अर्पण केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून त्याची पत्नी माहेरी राहत होती. ती पुन्हा सासरी येण्यास नकार देत होती. पत्नीचा विरह सहन न झाल्याने या व्यक्तीने आपली बोटच कापली आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कोरबा जिल्ह्यात पत्नीचा विरह सहन न झाल्याने एका पुजाऱ्याने आपली बोटं कापून भगवान शंकराला अर्पण केली. कोरबा शहरापासून तब्बल 10 किलोमीटर दूर असलेल्या परिसरातील शिव मंदिरात ही भयंकर घटना घडली आहे. ही व्यक्ती याच मंदिरात पुजारी आहे. चार वर्षांपासून त्यांची पत्नी माहेरीच राहत होती. पत्नीला किडनी स्टोनचा त्रास असल्याची माहिती मिळत आहे. यावर उपचारासाठी पुजाऱ्याची पत्नी माहेरी निघून गेली. मात्र तिची आता पुन्हा सासरी येण्याची तयारी नाही.
लक्ष्मीनारायणने दिलेल्या माहितीनुसार, पत्नी नसल्यामुळे दोन्ही मुलांची नाट काळजी घेतली जात नाही. त्यांच्याकडे लक्ष द्यायला, देखभाल करायला कोणी नाही. त्यांना पण त्यांच्या आईची खूप जास्त आठवण येते. लक्ष्मीनारायणने आधी देखील आपल्या सासऱ्यांनाही पत्नीला परत पाठवण्याची विनंती केली. तसेच असं न केल्यास काही तरी चुकीचं पाऊल उचलेन असं देखील म्हटलं होतं.
लक्ष्मीनारायणच्या मनात नको ते विचार येत होते. तणावात होता. आता पती-पत्नी कधीच एकत्र येऊ शकणार नाही असं त्याला वाटत होतं. त्यामुळे त्याने शंकराची पूजा सुरू केली. सर्व व्यवस्थित करण्याची इच्छा प्रकट करून त्याने शंकराला आपल्या हाताची दोन बोटं कापून अर्पण केली. यानंतर पुजाऱ्याला स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.