नालासोपारा : पत्नीनेच पतीच्या हत्येची एक लाखाची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. सुपारी देणाऱ्या पत्नीसह तीन आरोपींना ४८ तासांत अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची चर्चा असल्याने पोलिस त्याच दृष्टीने तपास करत आहेत.
२७ जानेवारीला संध्याकाळी नायगाव रिक्षा स्टँडजवळील ब्रिजखाली खाडीच्या पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खाडीत फेकून दिल्याने फुगलेल्या, कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविणे व आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलिस निरीक्षक शाहुराज रणवरे यांनी पाच पथके तयार केली होती. पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यांतील मिसिंग रजिस्टर तपासले. मात्र, काहीही माहिती प्राप्त न झाल्याने मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील पोलिस ठाण्यांतील मिसिंग रजिस्टर चेक केले. यातील मृताने परिधान केलेल्या कपड्यांचे वर्णन मुंबईतील बांगूरनगर पोलिस ठाण्यात मिसिंग व्यक्तीच्या कपड्याशी जुळले. त्याचे नाव कमरुद्दीन मोहम्मद उस्मान अन्सारी (३५) हे असल्याचे निष्पन्न केले.
पैशांच्या हव्यासापोटी केला प्रकारn गोरेगाव येथे राहणाऱ्या कमरुद्दीन यांच्या शेजारी राहणारे आरोपी बिलाल उर्फ मुल्ला पठाण (४०), त्याची पत्नी सौफिया पठाण (२८) हे घटना घडल्यापासून परिसरातून निघून गेल्याची माहिती मिळाली. n ते वापी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यांना त्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यावर त्यांनी पैशाच्या हव्यासापोटी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. n तसेच पतीच्या हत्येसाठी प्रेरणा देणारी त्याची पत्नी आशिया अन्सारी हिला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.