- मंगेश कराळे
नालासोपारा - आईच्या तेराव्याच्या कार्यासाठी लागणारे पैसे उपलब्ध व्हावे म्हणून पत्नीकडे आरोपी पतीने कानातील सोन्याच्या बाली मागितलेल्या. तिने देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात आरोपी पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली होती. याप्रकरणी पळून जाणाऱ्या आरोपी पतीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या टीमने अटक केली आहे.
संतोष भवनच्या चौधरी कंपाऊंड येथील समीरा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या संजू सरोज (३५) या महिलेची हत्या शनिवारी झाली होती. आरोपी पती राजेश विश्वकर्माने त्याच्या आईचे निधन झाले होते. तिच्या तेराव्याच्या कार्यासाठी लागणारे पैसे त्याच्याजवळ नव्हते. म्हणून त्याने पत्नीकडे तिच्या कानातील सोन्याच्या बाली मागितल्या. पण तिने देण्यास नकार दिला होता. हाच राग मनात धरून आरोपीने त्यांना मारहाण करून कशाने तरी गळा आवळून हत्या केली होती. हत्या केल्यानंतर मृतदेह घरातच ठेवून दरवाजाला टाळा लावून आरोपी फरार झाला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी हे सदर गुन्हयातील आरोपीत याचा शोध घेत असतांना तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांचेकडून मिळालेल्या विश्वसनीय बातमीनुसार आरोपी हा रेल्वे गाडीने त्याचे मुळ गावी वाराणसी, उत्तरप्रदेश येथे पळून जात असल्याची बातमी मिळाली. गुन्हे शाखेचे पथक लागलीच ललितपुर येथे रवाना होवून रेल्वे सुरक्षा बल यांचे मदतीने नमुद गुन्हयातील आरोपी राजेश गयालाल विश्वकर्मा (३२) याला ललितपुर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी पेल्हार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.