Crime News: पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला, नंतर मृतदेह पोलीस ठाण्यात नेला आणि गुन्ह्याची दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 09:23 AM2021-12-08T09:23:21+5:302021-12-08T09:24:11+5:30
Crime News: मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील कटारा हिल्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये टाकून पोलीस ठाण्यामध्ये नेला.
भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील कटारा हिल्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये टाकून पोलीस ठाण्यामध्ये नेला. ही महिला पोलीस ठाण्यात पोहोचताच एकच खळबळ उडाली. या गुन्ह्यामध्ये महिलेच्या कथित प्रियकराने तिला मदत केली. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगीता नावाच्या महिलेने तिचा पती धनराज मीणा याच्यासोबत भोपाळमधील कटारा हिल्स परिसरामध्ये राहायची. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दरम्यान, तिचे आशिष नावाच्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. आशिष हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मात्र हे संबंध महिलेच्या पतीला मान्य नव्हते. तो त्यांच्यातील अनैतिक संबंधांना विरोध करत होता. त्यामुळे पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीचा काटा काढण्याचा कट रचला.
दरम्यान, हत्येचे कारण आणि हा कट पूर्णत्वास नेण्याची घटनाही सनसनाटी आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेने पतीची हत्या करण्यापूर्वी त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याला गाढ झोप लागल्यावर पत्नी आणि तिच्या प्रियकराने दांडक्याने मारहाण करून त्याची हत्या केली. हत्येनंतर रात्रभर त्याचा मृतदेह घरातच ठेवला. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यावर विचार विनिमय सुरू असतानाच अचानक ते दोघे मृतदेह गाडीच्या डिकीमध्ये घालून पोलीस ठाण्यात पोहोचले.
पोलीस ठाण्यामध्ये स्विफ्ट डिझायर गाडी आल्यानंतर तिची डिक्की खोलली तेव्हा एकच खळबळ उडाली. डिक्कीतील मृतदेह पाहून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना एकच धक्का बसला. डिक्कीमध्ये एक मृतदेह कपड्यात लपेटून ठेवण्यात आला होता. दरम्यान, महिला आणि तिच्या प्रियकराने पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आपला गुन्हा कबूल केला. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, हत्येमागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.