नवी दिल्ली - बिहारच्या सहरसामध्ये एक हैराण करणारी घटना घडली आहे. पोलीस दलात नोकरी लागताच पत्नी चक्क आपल्या पतीला विसरली. पत्नीने थेट पतीला ओळखण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. बिचाऱ्या पतीने यानंतर पोलिसांत धाव घेतली असून तो न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकरणात पीडित पतीने समस्तीपूरच्या पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे.
पतीने दिलेल्या माहितीनुसार, एक तरुणी त्याला विमानतळ मैदानात भेटली. दोघांची ओळख झाली. त्यावेळी मैदानात दोघे भरती परिक्षेसाठी आले होते. बिहार पोलीस दलात भरतीसाठी तरुणी प्रयत्नशील होती. तर पीडित तरुण लष्कर भरतीसाठी प्रयत्न करत होता. त्या दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाआधी हे दोघेही चार महिने सोबत राहिले. त्यानंतर गेल्या महिन्यात दोघांच्या कुटुंबीयांच्या सहमतीनं त्यांचं लग्न लावून दिलं. सहरसामधील मटेश्वर धाम मंदिरात दोघांचा विवाह झाला.
लग्नानंतर पत्नीला बिहार पोलीस दलात रुजू होण्याचं पत्र आलं. त्यानंतर पत्नी पैशांची मागणी करू लागली. तिच्यासाठी आतापर्यंत 14 ते 15 लाख रुपये खर्च केल्याचं तरुणाने सांगितलं. ती प्रशिक्षणासाठी गेली तेव्हा तरुणी तिला भेटायला गेला. मात्र तिने आपल्या पतीला ओळखण्यास नकार दिला. काही दिवसांनी पुन्हा एकदा पती भेटण्यास गेला. त्यावेळी पत्नीने एका शिपायाच्या माध्यमातून त्याला घाबरवलं आणि निघून जाण्यास सांगितलं. प्रशिक्षण संपल्यावर आपण सोबत राहू, असं आश्वासन तिने पतीला दिलं.
प्रशिक्षण संपल्यावर पत्नी गावाला आली. तिने पंचायत बोलावली आणि चार-पाच लोकांना बसवून त्यांच्यासमोर आता मला पतीसोबत राहायचं नसल्याचं सांगितल्याचा आरोप पतीने यांनी केला. यानंतर पतीने समस्तीपूरच्या पोलीस अधीक्षकांकडे न्यायासाठी अर्ज केला. पत्नी सध्या पिटोरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तर पीडित तरुण न्यायाच्या प्रतीक्षेत असून दोघांचा विवाह 2021 मध्ये झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.