- चैतन्य जोशीपुलगाव (वर्धा ) - दोन दिवसांपूर्वी पुलगाव रेल्वेस्थानकाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तीचे शीर आढळून आले होते. रेल्वे पोलीस तपास घेत असतानाच हे बेवारस शीर पुलगाव येथील हिंगणघाटफैल परिसरातील रहिवासी व्यक्तीचे असल्याची ओळख पटली. अन् हे क्रुर हत्याकांड उजेडात आले. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी मृतकाच्या पत्नीला अटक करुन अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याची माहिती पाेलिसांनी दिली. अनिल मधुकर बेंदले (४६) असे मृतकाचे नाव आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्यात मृतकाची पत्नी मनिषा बेंदले हिचा समावेश असून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
६ ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीचे अर्धवट जळालेले शीर पुलगाव स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मिळून आले होते. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी ७ रोजी मर्ग दाखल करुन पुढील तपास सुरु केला होता. या प्रकरणात क्रुर हत्याकांड झाल्याचे आता उजेडात आले असून ते बेवारस शीर अनिल बेंदले याचे असल्याची खात्री पटली आहे. याबाबतची तक्रार मृतकाचा भाऊ सुनिल बेंदले याने पुलगाव पोलिसात दिली आहे.
मृतक अनिल हा मलकापूर बोदड येथील रहिवासी आहे. अनेक वर्षांपासून तो गृहरक्षक दलात काम करीत होता. गृहरक्षकांनी केलेल्या आंदोलनानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तो रोजमजुरी करीत होता. त्याला दारुचेही व्यसन होते. यामुळे दररोज घरात पत्नीशी खटके उडायचे. एक मुलगा दहावीत शिकत असून दुसरा मुलगा सहा वर्षाचा आहे. अखेर दररोजच्या उडणाऱ्या खटक्यांना कंटाळून पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने घरातच अनिलची हत्या केली. घरातच मृतदेहाचे तुकडे करुन ते तुकडे पिशवीत भरुन मलकापूर बोदड गावात अनिलच्या घरासमोरच जाळून मृतदेहाची विल्हेवाट लावली. मात्र, शीर न जळाल्याने रेल्वे रुळालगत फेकून दिले होते. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, राजू हाडके, खुशालपंत राठौर, संजय पटले, पंकज टाकोणे, महादेव सानप,शरद सानप करीत आहे.
असा घडला घटनाक्रम...मृतक अनिलची त्याच्याच पत्नी व मुलाने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हत्या केली. रात्रभर त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर शनिवारी दुपारी १.३० ते २ वाजताच्या सुमारास अनिलच्या मुलाने मलकापूर बोदडसाठी २०० रुपयांचा एम.एच. ३२ बी. ८३०३ क्रमांकाचा ऑटो केला. चालक प्रशांत भोयर याने हिंगणघाटफैल परिसरात अनिलच्या घरापुढे ऑटो लावला. आरोपी मनीषा आणि तिच्या मुलाने घरातून एक बैग, मोठी पिशवी आणून ऑटोत ठेवली. चालकाने दोघांनाही अनिलच्या मूळ गावी मलकापूर बोदड येथे त्याच्या वडिलांच्या घरासमोर सोडून दिले. घरातील परिसर मोठा असल्याने त्या पिशव्या एका कोपऱ्यात ठेवल्या. अनिलच्या वडिलांनी विचारणा केली असता जुन्या कपडे आहे ते जाळायचे असल्याने आणले असे सांगितले. आणि चक्क वडिलांसमोर पत्नी मनीषा आणि तिच्या मुलाने तुकड्यांत पिशवीत पुरलेला अनिलचा मृतदेह त्याच्याच घराच्या काही अंतरावरच जाळला. मात्र, शीर जळाले नसल्याने ते रेल्वे ट्रॅकवर फेकून दिले. मृतदेहाची हाडं पाठविली प्रयोगशाळेतअनिल बोंदले याची हत्या झाल्याचे उजेडात येताच मलकापूर बोदड गावात वर्ध्यातील फॉरेन्सिक चमूने धाव घेतली. ९ ऑगस्ट रोजी बोदड गाव गाठून घटनास्थळाहून मृतदेहाची हाडं जमा करुन ती हाडं फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मनीषा होती कराटेत पारंगतआरोपी मनीषा ही कराटेमध्ये पारंगत होती. तीला कराटेत ग्रीन बेल्टही प्राप्त झाला आहे. मात्र, तिने अल्पवयीन मुलाच्या मदतीने पतीची क्रुर हत्या कशी केली, मृतदेहाचे तुकडे नेमके कसे केले. हे पोलीस तपासात पुढे येणार आहे.