नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुरादाबाद जिल्ह्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला. पण विरह सहन न झाल्याने पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे. महिलेने आपल्याच खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना तपासादरम्यान महिलेने लिहिलेली सुसाईड नोट सापडली. यात महिलेने जे काही लिहिलं होतं ते वाचून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
महिलेने आपल्या सुसाईड नोटमध्ये सर्वजण माझ्यापासून हळूहळू दुरावत आहेत. आता मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही असं म्हटलं आहे. तसेच "मी माझे पती अमितकडे जात आहे. आई-बाबा मला माफ करा. अमित तुम्ही जिथं कुठे असाल मीदेखील तिथेच येतेय. तुमच्या शिवाय मी जगू शकत नाही. माझ्या मृत्यूसाठी जबाबदार मीच आहे. त्यामुळे माझ्यानंतर कोणालाही त्रास देऊ नका" असं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरादाबाद येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. ललिता नावाच्या महिलेने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली. यात लिहिलं होतं की, आधी भाऊ आणि नंतर पतीचा मृत्यू... हळूहळू सर्वजण माझ्यापासून दूर जात आहेत. आता तर पतीशिवाय मी जगू शकत नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित यांचा काही महिन्यांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर पत्नी ललिताला धक्का बसला होता. शुक्रवारी सायंकाळी ललिताने खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांना नऊ वर्षांचा एक मुलगा आणि सात वर्षांची मुलगी आहे. या घटनेने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.