भिवंडी : तालुक्यातील कांबे परिसरात रस्त्यालगतच्या पुलाखाली मृतदेह गोणीत बांधून फेकलेल्या हत्येचा शोध लावत तीन आरोपींना अटक करण्यात निजामपुरा पोलिसांनी यश आले आहे अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
२० जानेवारी रोजी कांबे पॉवर हाऊस जुनांदुरखी रस्त्यावरील रुपाला ब्रिजचे खाली रक्ताने माखलेल्या एका गोणी मध्ये मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला या मयत इसमाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी पोलीस पथके बनवीत तपास सुरू केला होता. तपासात मृतदेहाच्या शर्टाच्या खिश्यात अर्धवट फाटलेले डॉक्टर प्रिस्किप्शन सापडल्यानंतर याआधारावरून तपासाची दिशा ठरवण्यात आली. मेडिकल दुकानदार यांच्याकडून प्रिस्किप्शन कोणत्या भागातील डॉक्टरची आहे याचा शोध घेत असतांनाच पोलिसांना एक महिला आपल्या पतीचा शोध घेत असल्याचे समजले.
या महिलेला बोलावून मृतदेहाची ओळख पटवली असता तो मृतदेह अरमान शेर अली शाह ( वय ४५ रा.आमपाडा ) याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याची हत्या कोणी केली या बाबत शोध घेत असताना हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीचे ती काम करीत असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या मोहम्मद सलमान अब्दुल मुकीद शेख या सोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आलेय मयत व्यक्तीने ती काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन मालकास या बाबत सांगत सलमान यास जाब विचारला होता. त्याचा राग मनात ठेवून त्याने आपले सहकारी तस्लिमा हलीम अन्सारी व चांदबाबु उर्फ बिलाल सईद अन्सारी यांच्या मदतीने अरमान शेर अली शाह यास फसवून नेत त्यावर हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली.
अवघ्या ४८ तासांत अटकया घटनेत कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी या हत्येच्या गुन्ह्यातील मृतदेहाची ओळख पटवीत हत्या करणाऱ्या आरोपींना अवघ्या ४८ तासात अटक केली. गुन्ह्याचा उलगडा निजामपुरा पोलिसांनी केला असून या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता २८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे .