नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमधील अन्नामया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रायचोटी शहरातील रामापुरम परिसरामध्ये एका महिलेने तिच्या सूनेची क्रूरपणे हत्या केली. सासूने आधी सुनेचं शीर धडावेगळं केलं. त्यानंतर ते हातात घेऊन ती पोलीस ठाण्यात पोहोचली. हा प्रकार पाहून पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेचं नाव सुब्बाम्मा आहे आणि तिच्या सुनेचं नाव वसुंधरा होतं. वसुंधराच्या पतीचा दहा वर्षांपूर्वी एका दुर्घटनेत मृत्यू झाला होता. तेव्हापासून वसुंधरा ही तिच्या पतीच्या मावशीसोबत राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून वसुंधराच्या वागण्यामध्ये काही बदल दिसून येत होता. तिचे मल्लिकार्जुना नावाच्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे तिचे आणि तिच्या सासूचे या विषयावरून खटके उडत होते. तसेच दोघींमधील संबंधही या प्रकरणामुळे बिघडले होते.
पोलिसांनी सांगितले की, आज सकाळीसुद्धा वसुंधरा आणि सुब्बाम्मा यांच्यात भांडण झाले होते. वसुंधराने सासूला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वसुंधराचं बोलणं ऐकून सासू घाबरली. वसुंधरा तिच्या प्रियकरासोबत मिळून आपली हत्या करून आपली संपत्ती बळकावेल, अशी भीती तिला वाटली. असं झाल्यास आपल्या नातवंडांसाठी काही उरणार नाही, असा विचार तिने केला.
त्यानंतर सुब्बाम्माने तिचा भाऊ चंद्रबाबू याच्या मदतीने मिळून वसुंदराची धारदार हत्याराने गळा कापून हत्या केली. त्यानंतर ती पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी तिला अटक केली.
वसुंधराच्या दोन्ही मुली शाळेत गेल्या असताना ही धक्कादायक घटना घडली. जेव्हा त्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांना आईची हत्या झाल्याचे कळले. या प्रकारामुळे या दोन्ही मुली पूर्णपणे निराधार झाल्या आहेत.