लखनौ - उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये पत्नी असताना चुलत बहिणीच्या प्रेमात पडलेल्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाहबुद्दीन (२५) असे या हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबीयांनी आडकाठी केल्यानंतरही या तरुणाने काकाच्या मुलीला म्हणजेच त्याच्या चुलत बहिणीला भेटणे बंद केले नव्हते. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी या मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर या तरुणाचा बुधवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला होता. या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी दोन महिलांसह एकूण सहा आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
ही घटना सरधना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहल्ला धर्मपुरू येथील यामीन यांचा मुलगा शाहबुद्दीन याचे त्याचा काकाच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. याची कुणकूण त्या तरुणीच्या कुटुंबीयांना लागली. ते त्याला विरोध करत होते. तर हे प्रेमी युगुल निकाह लावून देण्याचा हट्ट धरून होते. ही बाब या तरुणीच्या कुटुंबीयांना खटकली होती. तीन दिवसांपूर्वी शाहबुद्दीन घरून कामावर जात असताना या तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याला अडवले आणि मारहाण केली. त्यानंतर या तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र बुधवारी रुग्णालयात उपचार सुरू असताना या तरुणाचा मृत्यू झाला. माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूप्रकरणी त्याचे वडील यामीन यांनी त्यांचा भाऊ कय्यूम, त्याचे मुलगे नईमुद्दीन, शावेद, जावेद, सबिला आणि सून तबस्सूम यांच्याविरोधात तक्रार दिली. त्या आधारावर पोलिसांनी दोन महिलांसह एकूण सहा जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपास सुरू केला आहे.