मुंबई : कुर्ला येथील एचडीआयएलच्या बंद इमारतीत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने शनिवारी खळबळ उडाली. बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
कुर्ला येथील एचडीआयएल कंपाउंडमधील बंद इमारतीच्या १३ व्या मजल्यावर तीन तरुण इन्स्टाग्राम व्हिडीओ शूट करण्यासाठी गेले असताना तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षात दुरध्वनी करून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणीच्या डोक्यावर मारहाणीच्या गंभीर खुणाही आढळून आल्या आहेत. तसेच मृतदेहही कुजल्याचे दिसून आले.
पोलिसांनी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक तपासात बलात्कारानंतर तिची हत्या केल्याच्या संशयातून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने काही हाती लागते का, यासाठी एका पथकाने प्रयत्न केले. विविध पोलीस ठाण्यात दाखल हरवलेल्या मुलींच्या माहितीवरून मृत तरुणीची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू असताना ती गोवंडी येथील राहणारी असल्याचे आढळले. या घटनेचा गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहेत.
या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केल्याचे परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून अत्याचार झाल्याचे समोर आले असून त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दोघा अटक आरोपींची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
हत्येमागे प्रेमप्रकरण असल्याचा संशयमृत तरुणी १८ वर्षांची असून गोवंडीतील रहिवासी आहे. तिचे यातील १८ वर्षीय अटक आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. ती त्याच्यामागे सतत लग्नाचा तगादा लावत असल्याने त्याने मित्राच्या मदतीने तिच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे. २३ नोव्हेंबर रोजी त्याने तिला भेटण्याच्या बहाण्याने कुर्ला एचडीआयएल येथे बोलावून तिची हत्या केल्याचे आढळत आहे. दोन्ही आरोपी १८ ते २० वयोगटातील आहे. त्यांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले का, याबाबत पथक अधिक तपास करत आहे.
गेल्या ९ महिन्यांत ६९५ बलात्काराच्या घटनागेल्या ९ महिन्यांत मुंबईत बलात्काराच्या ६९५ घटनांची नोंद मुंबई पोलिसांच्या दफ्तरी झाली आहे. यापैकी ५९३ घटनांची उकल झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीसंदर्भात सर्वाधिक ४०८ घटनांचा यात समावेश आहे.