लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : येथील स्वराज पतसंस्थेचे एक कोटी रुपयाचे कर्ज मिळविण्यासाठी खोटे दस्तावेज जमा करून पतसंस्थेची फसवणूक केली व कर्ज बुडविण्यासाठी संस्थेची बदनामी केल्याबद्दल दिगंबर आगवणे यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
स्वराज पतसंस्थेचे शाखाधिकारी दत्तराज फडतरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिगंबर आगवणे यांनी एक कोटी रुपयाच्या कर्जासाठी तारण म्हणून सुरवडीतील स्थावर मिळकतीचा कायदेशीर मालकी हक्क नसताना ‘ती आपली आहे’ असे भासवून तारण म्हणून व ती मिळकत जास्त किमतीची असल्याचे भासवून तसा बनावट रिपोर्ट कर्ज रक्कमकरिता गहाणखत करून संस्थेची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच एक कोटी रुपयांचे कर्ज २ एप्रिल २०१६ रोजी घेऊनसुद्धा वसुलीला बगल देण्यासाठी पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ यांची बदनामीकारक वक्तव्य केले. याबद्दल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी फलटण यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. त्यावरून तपास करून अहवाल देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने दिगंबर आगवणे यांच्याविरुद्ध खोटे दस्तावेज तयार करणे, बदनामी करणे व संस्थेची फसवणूक करणे असा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करीत आहेत.