देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. देशाने या ७५ वर्षांत विलक्षण प्रगती केली आहे. परंतू, गुन्हेगारीने देखील पार मुळापर्यंत हात पाय पसरले आहेत. १९४८ मध्ये स्वातंत्र्याच्या एक वर्षात पोलीस ठाण्यांमध्ये ६ लाखांच्या आसपास गुन्हे नोंद झाले होते. २०२१ मध्ये याच गुन्ह्यांची संख्या साठ लाखांवर गेली आहे. स्वातंत्र्यानंतर देशातील गुन्हेगारी ही दहा टक्क्यांनी वाढली आहे. ही त्या त्या वर्षाची आकडेवारी आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. एनसीआरबी ही केंद्र सरकारचीच एजन्सी आहे. ती १९५३ पासूनची आकडेवारी प्रसिद्ध करते, तसेच पहिल्या अहवालात या संस्थेने १९४८ चे आकडे देखील दिले होते.
नुकताच NCRB ने 2021 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार गेल्या वर्षी देशभरात 60.96 लाख गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले. यापैकी 36.63 लाख खटले भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत नोंदवले गेले. तथापि, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये सुमारे 8% कमी गुन्हे नोंद झाले होते. 2020 मध्ये 66 लाखांहून अधिक गुन्हे नोंद करण्यात आले होते. 2021 मध्ये देशभरात 29,272 हत्येचे गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजेच दररोज 80 मर्डर. 2020 च्या तुलनेत हा आकडा 0.3% ने जास्त आहे. 2020 मध्ये खुनाचे 29,193 गुन्हे दाखल झाले होते. बहुतांश हत्यांमागे वाद कारणीभूत असल्याचे देखील यात म्हटले आहे. गेल्या वर्षी या वादातून 9,765 खून झाले होते. त्याच वेळी वैयक्तिक वैमनस्यातून 3,782 खून झाले आहेत.
2021 मध्ये महिलांबाबतच्या 4.28 लाखांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर बलात्काराचे ३१,६७७ गुन्हे दाखल झाले. दर तासाला तीन महिलांवर बलात्कार झाले आहेत. बलात्काराच्या प्रयत्नाचे ३,८०० गुन्हे दाखल झाले. बलात्काराच्या घटनांमध्ये 97% आरोपी हे ओळखीतलेच होते. 2,024 प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्यच बलात्कार करणारा होता.