कामशेत : पंडित नेहरू विद्यालयातील अकरावीत शिकणाऱ्या मुलीला एक वर्षांपासून त्रास देणाऱ्या मुलाने सोमवारी तिचा पाठलाग करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. २२) रोजी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास पंडित नेहरू विद्यालय सुटल्यानंतर पवन मावळातील बेडसे येथील अल्पवयीन विद्यार्थिनीचा बाजारपेठेतील जैन मंदिराजवळुन जाताना पाठलाग करत शुकशुक करून थांब असे म्हणुन तिच्या हाताला धरून मागे ओढले, मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे करत आहेत. गेल्या एक वर्षांपासून हा मुलगा मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. याविषयी मुलीने घरी माहिती दिल्यावर मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरच्यांना याची माहिती दिली. त्यावेळी मी मुलीला पुन्हा त्रास देणार नाही अशी कबुली मुलाने दिली होती. मात्र मुलाने पुन्हा मुलीला त्रास द्यायला सुरवात केल्याने मुलीच्या आईने व मावशीने त्याला कामशेत येथे मुलीचा हात पकडून त्रास देताना रंगेहाथ पकडले. तो तेथुन पळुन गेल्यावर सोमवारी मुलाच्या विरोधात कामशेत पोलिसात तक्रार दिली . शहरातील पंडित नेहरू विद्यालय परिसरात टवाळखोर तरुण व काही उनाड विद्यार्थ्यांनी उच्छाद मांडला असुन शाळा सुटण्याच्या व भरन्याच्या वेळेत रस्त्याने जाणा?्या मुलींवर शेरेबाजी, छेडछाड, मोबाईलवर फोटो काढणे आदी प्रकार घडत आहे. शिवाय अल्पवयीन दुचाकीचालक, ट्रिपल शीट बसुन वाहने भरदाव वेगाने चालवणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, मुलींना कट मारणे, छेडछाड करणे आदी प्रकारात गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झाली असुन या प्रकारांकडे शाळा प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याची पालकांनी आरोप केला आहे.
कामशेत येथे विनयभंग प्रकरणी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 18:21 IST