हिंजवडी : कायदेशीर बाबींची पूर्तता करून विकत घेतलेल्या भुखंडाची सातबारा नोंद करण्याचे तहसीलदारांनी आदेश दिले असतानाही, हिंजवडीचे तत्कालीन गावतलाठी आणि पौडचे तत्कालीन नायब तहसीलदार यांनी संगनमत करून विरोधात निकाल देऊन मिळकत त्रयस्थ व्यक्तीच्या नावे हस्तांतरित केली. या निकालाविरोधात अपील करुनसुद्धा तब्बल तेरा वर्षांनंतरही निर्णय दिला नसल्याने संबंधीतांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी शशिकांत विश्वनाथ भोसले (वय ५३, रा. येरवडा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार यशवंत बापू सावंत (रा. भोईर कॉलनी, चिंचवड), स. न. खिरीड (तत्कालीन गावकामगार तलाठी, हिंजवडी) तसेच एन. बी. धनगर (तत्कालीन नायब तहसीलदार, पौड) यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फियार्दी भोसले यांनी १९९७ मध्ये हिंजवडी येथे सर्व्हे क्रमांक ६.७५ गुंठे इतके क्षेत्र कायदेशीर बाबींची पूर्तता करून खरेदी केले होते. त्याची सातबारा उताºयावर नोंद घेण्याबाबत पौडचे तत्कालीन तहसीलदारांनी आदेश दिले होते. असे असतानाही आरोपी यांनी आपापसात संगनमत करून सातबारा नोंद न करता राहूल वाघमारे नामक व्यक्तीने हरकत घेतली असल्याचे सांगितले. वाघमारे यांच्या पूर्वीच्या अर्जावर खाडाखोड करून त्या आधारे पौडचे तत्कालीन नायब तहसीलदार एन. बी. धनगर यांनी चौकशी करून आरोपी यशवंत सावंत यांच्या बाजूने निर्णय देऊन फियार्दी भोसले यांनी खरेदी केलेली मिळकत आरोपी यशवंत सावंत यांच्या नावावर संगनमताने हस्तांतरित केली. नायब तहसीलदार यांनी दिलेल्या निर्णया विरोधात फियार्दीने अपील करूनसुद्धा १३ वर्षांनंतरही त्यावर निर्णय दिला नाही. त्यामुळे भोसले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. परिमंडळ दोनचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते तपास करत आहेत.
पौडचे तत्कालीन नायब तहसीलदार, हिंजवडीच्या तत्कालीन तलाठ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 8:42 PM