नालासोपारा : मोरेगावात रविवारी रात्री मुख्य रस्त्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा मोबाइलवरून छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सुपारी देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यासह चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडले आहे, तर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करणाऱ्या तीन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.नालासोपाऱ्याच्या मोरेगाव येथील पाणीपुरी, भेलपुरीचे दुकान असलेला राजकुमार ऊर्फ बैल गुप्ता (३२) आणि मोबाईलचे दुकान असलेला बली गुप्ता या दोघांवर दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी कोयता, चाकूने राजकुमार गुप्तावर वार करून गावठी कट्यातून चार गोळ्या झाडल्या होत्या.घटनास्थळावरून मिळालेल्या आरोपींच्या मोबाईलवरून क्राईम युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या टीमने उलगडा केला आहे. चाकूने वार करणाऱ्या सलमान याला पोलिसांनी ट्रॉबे येथून सोमवारी रात्री पकडले व पुढील तपास व चौकशीसाठी तुळींज पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.या गोळीबारासाठी आणि भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सुपारी देणाऱ्या भाजप पदाधिकारी चंद्रशेखर ऊर्फ बबुआ गुप्ता यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. फरार तीन आरोपींचीही नावे सिद्ध झाली असून त्यांचा शोध घेत पोलीस तपास करत आहे. जखमी राजकुमार ऊर्फ बैल गुप्ता (३२) याची तब्येत खालावली असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून तुळींज पोलीस ठाण्याचे एक पोलीस अधिकारी आणि तीन कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते.नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगरमध्ये सुभाषचंद्र रामसागर गुप्ता (२१) याला १७ मार्च २०१६ ला दारू पाजून चार मित्रांनी गळ्यात रश्शी टाकून त्याचा गळा दाबून खून केला होता. यातील चारही आरोपींना अटक करून सुटका झाल्यानंतर राजकुमार ऊर्फ बैल गुप्ता (३२) याच्यासोबत अनेक वेळा चंद्रशेखर ऊर्फ बबुआ गुप्ता याने पाहिले होते. तेव्हा माझ्या भावाच्या हत्येत राजकुमारचा हात असल्याचा संशय त्याच्या मनात येत असल्याने आरोपी चंद्रशेखर ऊर्फ बबुआ याने चार महिन्यांपूर्वी यातील आरोपींना राजकुमार याला मारण्याची सुपारी दिली होती.
गोळीबार गुन्ह्याचा उलगडा झाला असून सुपारी देणाऱ्या आरोपीसह एकाला अटक केले आहे. तीन फरार आरोपींचा शोध घेत असून लवकरच अटक करण्यात येईल. दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी आहे.- राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे.