मुंबई - मुंबईपोलिसांनी चोरीच्या प्रकरणात टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्रींना अटक केली आहे. दोन्ही अभिनेत्री टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम क्राईम पेट्रोल आणि अनेक इतर क्राइम शोमध्ये लहान-मोठ्या भूमिका करत होत्या. कोरोनाकाळात झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचे चित्रिकरण बंद झाल्यामुळे दोन्ही अभिनेत्री आर्थिक चणचणीचा सामना करत होत्या. दोन्ही अभिनेत्री ह्या एका घरात पेईंग गेस्ट म्हणून आल्या आणि त्यांनी लॉकरमधील ३ लाख २८ हजार रुपयांवर डल्ला मारला, असा आरोप होत आहे. (Actress working in Crime Patrol commits crime, commits theft as a paying guest)
मिळालेल्या माहितीनुसार आरे कॉलनीमधील रॉयल पाम परिसरातील एका आलिशान इमारतीत राहणाऱ्या एका व्यर्तीकडे १८ मे रोजी या दोन्ही अभिनेत्री पेईंग गेस्ट म्हणून राहायला आल्या होत्या. त्याचदरम्यान, तिथे आधीपासून राहत असलेल्या एका पेईंग गेस्टच्या लॉकरमधून सुमारे ३ लाख २८ हजार रुपये घेऊन त्या पसार झाल्या.
या चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून शोध घेतला. त्यामधून अनेक महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागले. त्या पुराव्यांच्या आधारावर पोलिसांना या दोन्ही अभिनेत्रींना अटक केली.
पोलिसांनी तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा या दोघीही पैसे घेऊन बाहेर जाताना दिसल्या. जेव्हा पोलिसांनी दोघींची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी नूतन पवार यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या दोन्ही अभिनेत्रींनी टीव्हीवरील क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया या कार्यक्रमांशिवाय अनेक वेबसिरीजमध्ये काम केले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेल्या रकमेपैकी ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही अभिनेत्रींना कोर्टात हजर केले असता त्यांना २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.