मुंबई - कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ध्येय गाठता येतेच. चित्रकार नितीन यादव यांचे आयुष्यही काहीसे असेच ध्येयवादी होते. पोलीस अधिकारी होऊन त्यांना जनतेची सेवा करायची होती. मात्र झाले चित्रकार. मात्र, कोऱ्या कागदाच्या व पेन्सिलीच्या बळावर त्यांनी आजवर ४ हजारांहून जास्त गुन्हेगारांची चित्रे रेखाटली आणि त्यातून तब्बल ४०० हून अधिक आरोपींना पोलिसांनी बेड्याही ठोकल्या. पोलिस अधिकारी होता आले नसले तरी त्यांचे कार्य नक्कीच खाकी वर्दीतल्या पोलिसांइतकेच गौरवशाली आहे.
कुर्ला स्थानकाजवळील साबळे चाळीत यादव यांचे बालपण गेले. अन्यायाला वाचा फाेडण्यासाठी पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी बघितलेलं. मात्र, वडिलांची स्वदेशी मिल संपानंतर बंद पडली. गरिबीमुळे भावांनी रिक्षा व्यवसाय तर नितीन यांनी फलक रंगवणे आणि नावांच्या पाट्या बनवून आर्थिक भार उचलण्यास सुरुवात केली. दहावीत असताना आसपासच्या पोलीस चाैकीत फलक रंगवण्याची कामे नितीन यांना मिळू लागली. हे काम सुरू असताना साकीनाकाच्या जीएसके बारमध्ये एकाची हत्या झाली. त्यातील संशयिताचे रेखाचित्र काढण्यासाठी नितीन यांनी पोलिसांना परवानगी मागितली. पाेलिसांनी प्रयत्न म्हणून परवानगी दिली. हाॅटेलातील नोकराने केलेल्या वर्णनावरून नितीन यांनी रेखाटलेल्या चित्राद्वारे पोलिसांनी ४८ तासांत आरोपीला अटक केली. येथूनच या चित्रकाराच्या प्रवासाला सुरुवात झाली.
मुंबईत खळबळ माजविणाऱ्या २०१३ मध्ये शक्ती मिल कंपाउंडमध्ये महिला पत्रकारावर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यावेळी नितीन यांना रात्री २ वाजता पाेलिसांनी बोलावले. पीडितेच्या मित्राने केलेल्या वर्णनावरून सकाळपर्यंत त्यांनी ३ रेखाचित्रेरेखाटली . त्याआधारे पाेलिसांनी एकास अटक केली. त्यानंतर ४८ तासांतच चारही आरोपी पकडले. तसेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर कामा रुग्णालयात जाऊन या सर्व घटनांची रेखाचित्रे नितीन यादव यांनी बनवली. जर्मन बेकरी स्फाेटातील संशयितांचीही रेखाचित्रे यादव यांनी काढली. त्याचप्रमाणे अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संशयिताचे रेखाचित्र यादव यांनी बनवली आहेत. केवळ वर्णनावरून रेखाचित्र काढणे साेपे नसते. वर्णन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलेली प्रत्येक गाेष्ट कान, डाेळे उघडे ठेवून नीट ऐकून त्याचे अचूक संदर्भ जोडून संशयित आरोपीचे रेखाटण्याचं आव्हानात्मक काम चित्रकलेतून नितीन यादव साकारतात.