नवी मुंबई : सोनार बनून सोनारांनाच गंडा घालणाऱ्या टोळीच्या दोघा प्रमुखांना खारघर मधून अटक करण्यात आली आहे. गतमहिन्यात त्यांनी इंदोर येथील एका सोनाराला चार लाखाचा गंडा घातला होता. या टोळीने स्मार्ट पद्धतीने आजवर देशभरात अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे.
इंदोर येथील एका प्रसिद्ध सोनाराची चार लाखाची फसवणूक झाल्याची घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. या गुन्ह्यात इंदोर सायबर पोलिसांनी दोघांना काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. मात्र टोळीचे मुख्य सूत्रधार फरार असून ते नवी मुंबईत वावरत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी उपनिरीक्षक सम्राट वाघ यांचे पथक तयार केले होते. या पथकाने शनिवारी खारघरच्या कोपरा परिसराची झाडाझडती घेतली असता दोघेजण हाती लागले. नरेंद्र सिंग उर्फ दशरथसिंग राजपुरोहित (२८) व विजयसिंग सोलंकी (३५) अशी त्यांची नावे आहेत.
देशात महाराष्ट्राचा डंका! महाराष्ट्राच्या पोलीस दलाने ५७ पदके मिळवून देशात पटकावलं तिसरं स्थान
दोघेही मूळचे राजस्थानचे असून सराईत गुन्हेगार आहे. त्यांनी स्वतःला मुंबईचे सोनार भासवून इंदोरच्या एका ज्वेलर्स मध्ये फोन करून दिल्लीच्या एका व्यापाऱ्याला चार लाख रुपये देण्यास सांगितले. यासाठी त्यांनी मोबाईल व इंटरनेट याचा स्मार्ट पद्धतीने वापर करून इंदोरच्या सोनाराला आपण त्याच्या व्यावहारिक संबंधातील सोनार आहोत असे भासवले होते. परंतु फोनवरील सोनाराच्या सांगण्यावरून दिल्लीला पैसे पोचवल्यानंतर त्याची परतफेड न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे इंदोर च्या सोनाराच्या लक्षात आले. यानुसार त्याने इंदोर सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी दोघांना अटक झाल्यानंतर राजपुरोहित व सोलंकी हे खारघरमध्ये लपून बसले होते. त्यांच्याकडून कार (आर.जे. ४६ सी.ए. २३०९), सहा मोबाईल व महत्वाच्या व्यक्तींची माहिती असलेली चार पुस्तके जप्त केली आहेत. या पुस्तकांचा वापर करून ते कोणत्या सोनाराला कोणाच्या नावाने फोन करायचा हे ठरवत होते.