झारखंडच्या जामतारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे गुन्हेगारांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यांच्या कामात यश मिळालं नाही. हे प्रकरण जिल्ह्यातील करमाटांड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालाझारियाजवळचं आहे. बुधवारी रात्री गुन्हेगारांनी स्टेट बँकेचं पैसे असलेलं एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. गुन्हेगारांनी मोठ्या कष्टाने पैशांनी भरलेले एटीएम मशिन उखडून काढलं आणि ते त्यांनी सोबत आणलेल्या बोलेरोमध्ये टाकलं.
एटीएम गाडीत ठेवलं आणि तेथून पळ काढला. गुन्हेगार तेथून भरधाव वेगाने जात होते. याच दरम्यान, नारायणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदपूर-साहिबगंज महामार्गावरील बांसपहाडी गावाजवळ बोलेरो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. त्यामुळे वाहनाचं पूर्ण नुकसान झालं. त्याचवेळी घटनास्थळी पकडले जाण्याच्या भीतीने गुन्हेगारांनी एटीएमसह वाहन तिथेच सोडून पळ काढला आहे.
एटीएम लुटल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी रात्रीच या प्रकरणाचा तपास सुरू केला. यावेळी त्यांना बांसपहाडी गावाजवळील रामलखन लाईन हॉटेलसमोर बोलेरोचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता बोलेरो पाहून त्यांना मोठा धक्का बसला. अपघातग्रस्त बोलेरोमध्ये पैशांनी भरलेले एटीएम मशीन पडलेले असल्याचे त्यांनी पाहिले. पोलिसांनी मशीन ताब्यात घेतली. सध्या पोलिसांनी एटीएम मशीन आणि बोलेरो नारायणपूर पोलीस ठाण्यात ठेवली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, पोलिसांना चकमा देण्याच्या उद्देशाने गुन्हेगारांनी बोलेरो गाडीत बनावट नंबर प्लेट लावल्याचे उघड झाले, ज्याद्वारे त्यांनी एटीएम मशीन पळवून नेले होते. या प्रकरणाचा तपास करताना बोलेरोमध्ये ठेवलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय इतर अनेक कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तसेच हा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने छापे टाकत असून त्यांना लवकरच अटक करण्याची कारवाई करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.